मानधन नाही : काम करूनही वेळेवर पैसे मिळत नसल्याने आर्थिक अडचणचंद्रपूर : आशा वर्कर मागील सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. दिवाळी तोंडावर आली असतानाही मानधन न मिळाल्याने त्यांच्यासमोर मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. दिवाळीपर्यंत तरी मानधन मिळाले नाही, तर दिवाळी अंधारात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.गरोदर महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात नेणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित करणे यासह लसिकरण व अन्य कार्यक्रम राबविण्यात महत्वाची भूमिका आशा पार पाडतात.नागभीड तालुक्यातील आशा वर्करला मागील हा महिन्यांपासून कामाचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे आशा वर्करला दुसऱ्यांच्या कामावर जावे लागत आहे. प्रसंगी उपासमारही सहन करावी लागत आहे. ग्रामीण भागाचा दुवा असलेल्या आशा वर्करला त्यांच्या कामाचा मोबदला एप्रिलपासून मिळालेला नाही. त्यामुळे काम कसे करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.आशा वर्करमुळे गावातील गरोदर माता, स्तनदा माता यांना मार्गदर्शन लाभले. त्यामुळे गावातील महिलांना संजीवनी मिळते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच प्रसुतीच्या महिला रुग्णालयात जाऊ लागल्या आहेत. सोबतच कुटुंब कल्याण योजनेसाठी प्रोत्साहित केल्या जाते. गावात लसिकरणाचे कार्यक्रमही राबविल्या जातात. अशा अनेक शासनाच्या योजना आशा वर्करमार्फत पोहचविल्या जातात. मात्र, त्याच आशा वर्करला मोबदल्यापासून वंचित राहावे लागत आहे.मागील सहा महिन्यापासून या आशा वर्कर यांना कामाचा मोबदला मिळाला नाही. शासनाकडून आशा वर्करची अवहेलना सुरू आहे. आशा वर्करमुळे गावात अनेक उपक्रम राबविल्या जात आहेत. रात्री-बेरात्री आशा वर्कर या रुग्णांना सेवा देत आहेत. कुटुंबात जास्त वेळ न देता नागरिकांच्या सेवेत त्या जास्त काळ घालवत आहेत.याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. सहा महिने लोटूनही कामाचा मोबदला मिळाला नसल्याने दिवाळीच्या सणात तरी मोबदला मिळावा, अशी मागणी केली जात आहे.या प्रकारामुळे आशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामुळे त्यांचे काम प्रभावीत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
आशांची दिवाळी अंधारात
By admin | Updated: October 13, 2014 23:32 IST