सिंदेवाही : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात सहा हजार रुपये शेतकरी सन्मान अनुदान योजनेतून दिले जात आहेत. पण हा सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याऐवजी तो कर्ज खात्यात जमा करून कर्ज कपात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हाच काय आमचा सन्मान असा प्रश्न पडला आहे.
अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत व्हावी, या हेतूने केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षभरात तीन टप्प्यात दोन हजार प्रति टप्प्यानुसार सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देणे सुरू केले. केवळ शेतीवर जास्त उदरनिर्वाह आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत कमी असली तरी उपयोगी ठरत आहे. यातून शेतकरी पिकांना वेळेवर खते देऊन उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. पण सन्मान निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात, त्या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज आहे त्याच्याकडून बँक प्रशासन कर्ज कपात करते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. याचा विचार शासन व बँकांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.