आरोपीच्या वडिलांचा आरोप : बालसुधारगृहातील मुलाचे मृत्यू प्रकरणचंद्रपूर : घुग्घुस येथील अल्पवयीन मुलीच्या सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा चंद्रपूरच्या बालसुधारगृहात सहा दिवसानंतर मृत्यू झाला होता. याप्रकरणात मृत्यूला बालसुधारगृहातील अधिकारी व घुग्घुस पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप मुलांच्या वडिलाने चंद्रपूर येथे शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.घुग्घुसच्या अमराई वॉर्डातील एका अल्पवयीन मुलीवर त्याच परिसरातील अल्पवयीन आरोपीसह अन्य दोघांनी सामूहिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणात अल्पवयीन मुलासह प्रताप रमेश सिंग, आकाश राहुुल देवगडे याना अटक करण्यात आली होती. मात्र, यातील अल्पवयीन आरोपी याने अटकेपूर्वीच दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच पोलिसांनी त्याला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतले. स्थानिक डॉक्टरांनी त्याच्यावर उपचाराची गरज असून, त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. तो अस्वस्थ असतानाही त्याला स्वत:च्या ताब्यात ठेवले. दोन दिवसानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. यावेळी बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांना त्याने प्रकृती ठिक नसल्याची माहिती दिली. १० एप्रिल रोजी त्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून मुलाची प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले. यानंतर तात्काळ आम्ही भेटण्यासाठी गेलो. परंतु रुग्णालयात जातात बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांनी मृत्यूची बातमी दिली, असा आरोप पालकांनी केला आहे. पोलीस आणि बालसुधारगृहातील अधिकारी यांच्याा निष्काळजीपणाने मुलाचा मृत्यू झाला असे, पालकांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोपीच्या पालकांसह मामा इश्वर बेले, धम्मदीप पळवेकर, योगेश ठाकरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
डॉक्टर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाने मुलाचा मृत्यू
By admin | Updated: April 24, 2017 01:05 IST