निकृष्ट बांधकाम : नगराध्यक्षांचे चौकशीचे आदेशब्रह्मपुरी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नान्होरी पंप हाऊसची संरक्षण भिंत अंदाजे ४० लाख खर्च करून बांधण्यात आली. ती एक ते दीड वर्षातच कोसळल्याने जमीनदोस्त झाली आहे. मागील कार्यकाळातील निकृष्ट बांधकामाचा हा पुरावा असून अनेक कामे अशाच निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने नगराध्यक्षा योगिता बनपूरकर यांनी त्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. नान्होरी पंप हाऊस येथील संरक्षण भिंतीचे काम मागील कार्यकाळात झाले आहे. वैनगंगेच्या नदीच्या किनाऱ्यावर संरक्षण भिंत बांधून पंप हाऊस सुरक्षित राहावे, हा या संरक्षण भिंत बांधण्यामागील मुख्य उद्देश होता. परंतु तो उद्देश बाजूला ठेवून थातूरमातूर काम करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, २३ एप्रिल २०१६ ला १८ लाख ५१ हजार २७३ रुपयांचे पेमेंट करून नगरपालिका प्रशासनाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. पूर व जलप्रवाहाचा प्रचंड दबाव यामुळे किनाऱ्यावरील माती खचून नदीच्या पात्राची रूंदी वाढण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे. माती खचू नये व पंप हाऊसचे अस्तित्व अबाधित राहावे, यासाठी संरक्षण भिंत बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. नदीचा प्रचंड जलप्रवाह थोपवून धरण्यासाठी १० फूट खोल पाईलींग करण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्यक्षात तीन ते चार फूट खोल पाईलींग केल्याने पायाभरणी मजबूत झाली नाही.कमकुवत फाऊंडेशनवर भिंतीचे काम केल्यामुळे अवघ्या अडीच महिन्यात अंदाजे १० मीटर लांबीची भिंत कोसळली असल्याने मागील नगराध्यक्षांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा दुरूपयोग केला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात येईल व इतर कामाचे देयकही घाईगर्दीत अदा केल्याने त्या सर्व निकृष्ट कामाची चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, अशी माहिती एका पत्रकाद्वारे नगराध्यक्षा योगिता बनपूरकर यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नान्होरी पंप हाऊसची संरक्षण भिंत जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2016 00:48 IST