रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर : शासकीय रुग्णालयासमोरील फूटपाथवर घाणीचे साम्राज्य पसरले. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला साचलेला कचरा उचलण्याची मागणी नागरिकांनी मनपाकडे केली आहे.
दुर्गापूर मार्गावर गतिरोधक निर्माण करा
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु चार ठिकाणी गतिरोधक नाही. सकाळी व सायंकाळी अपघाताची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने गतिरोधक बांधावेत, अशी मागणी आहे.
अनुकंपाधारकांची रिक्त पदे भरावी
चंद्रपूर : शासकीय सेवेतील अनुकंपा तत्त्वावरील पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. वन, बांधकाम, महसूल व कृषी विभागात बरीच पदे रिक्त आहेत. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन होऊन पात्र व्यक्तींना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, असा आरोप अन्यायग्रस्त कुटुंबांनी केला आहे.
हनुमाननगरात स्वच्छता मोहीम राबवा
चंद्रपूर : शहरातील हनुमाननगर परिसरातील नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. घाण साचल्याने नागरिक हैराण आहेत. या प्रभागात स्वच्छता मोहीम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली.
मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण
नागभीड : शहरातील डुकरे व मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. मोकाट कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. नगर परिषदने मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी नगर परिषोकडे केली आहे.
कचराकुंड्यांची स्वच्छता करावी
चिमूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. चौकात ठेवलेल्या कचराकुंड्याही तुंबल्या आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न दुर्लक्षित झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या सभेत समस्यांवर चर्चा
चंद्रपूर : जि. प. कर्मचारी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली़ यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़ विनंती बदलीची अट पाच वर्षांवरून एक वर्ष करावी, सहायक पदावरून वरिष्ठ सहायक पदावर स्पर्धा परीक्षेच्या अटीसंदर्भात यावेळी विचारमंथन करण्यात आले़
रोजगार नसल्याने हजारो मजुरांचे हाल
भद्रावती : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू झाली नाही. गतवर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र, यावर्षी जॉबकार्ड वाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.
पाण्याअभावी भाजीपाला सुकण्याच्या मार्गावर
सिंदेवाही : तालुक्यात अनेक शेतकरी भाजीपाला पिकवितात. शेतकऱ्यांनी जि. प. योजनेतून सिंचन विहिरी खोदल्या. वीज वितरण कंपनीकडून कृषिपंपही घेतले. विहीर खोदून विविध पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. विहिरी कोरड्या पडल्या. त्यामुळे भाजीपाल्याची पिके सुकण्याच्या मार्गावर आली आहेत. सिंचनाची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
बाबूपेठ परिसरात डासांचा प्रादुर्भाव
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरात विविध वाॅर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही भागात नाल्यांचा उपसा होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. मनपाचे स्वच्छता कर्मचारी या परिसरातील प्रमुख वाॅर्डात दररोज येतात. मात्र, आडवळणाच्या प्रभागात जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
शास्त्रीनगरातील नाल्यांचे बांधकाम अर्धवट
चंद्रपूर : नेहरूनगर रय्यतवारी परिसरात नाली बांधकाम अर्धवट असल्याने विविध वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील सांडपाण्यातून नागरिकांना वाट काढत पुढे जावे लागते. महानगरपालिका प्रशासनाने निधीची तरतूद करून बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त
नवरगाव : नवरगाव-रत्नापूर परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतीला पाणी देण्यासाठी कृषिपंपधारकांना अडचणी येत आहेत.
ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
वरोरा : ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, पोलीस व परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.
हमीभावानुसारच धान विक्री करा
चिमूर : तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शासनाने हमीभाव जाहीर केला. मात्र, काही व्यापारी अल्पदराने धान खरेदी करीत आहेत. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी अधिकृत खरेदी केंद्रावरच धान्य विकावे, असे आवाहन प्रशासनाने केले.