शेतकऱ्यांचे नुकसान : विसापूरकर आंदोलनाच्या पवित्र्यातबल्लारपूर : चंद्रपूर वेकोलि क्षेत्रातील माना व नांदगाव कोळसा खाणीसाठी वर्धा नदीच्या कोलगाव घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक केली जाते. यामुळे नांदगाव (पोडे) विसापूर ते नदी घाटापर्यंतच्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वेकोलि प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रेतीची वाहतूक बंद करण्याची मागणी विसापूर ग्रामपंचायतीने केली आहे.विसापूर ते कोलगाव नदी घाट मार्ग कच्चा असून तीन किमीचा ग्रामीण मार्ग आहे. या मार्गावर वेकोलिच्या माना खुली कोळसा व नांदगाव इनक्वालाईन कोळसा खाणीला लागणारी रेती जडवाहनाच्या माध्यमातून वाहतूक केली जाते. परिणामी ८ ते १० टन क्षमतेचा मार्ग दुप्पट टनाच्या वाहतुकीमुळे खाचखळग्याचा झाला आहे. यामार्गाने दररोज २५ ते ३० जडवाहने रेतीची अहोरात्र वाहतूक करतात. यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे शेतातील पीक धुळीने करपले जात आहे.मागील सात-आठ वर्षापासून वेकोलि प्रशासन कंत्राटदाराच्या माध्यमातून वर्धा नदीच्या कोलगाव घाटाच्या नदीच्या पात्रातून रेतीचे उत्खनन करीत आहे. तेव्हापासून विसापूर ग्रामपंचायतीने वेकोलि व जिल्हा प्रशासनाकडे विसापूर ते कोलगाव वर्धा नदीपर्यंत रस्त्याला डांबरीकरण करुन मजबुतीकरणाची सातत्याने मागणी करीत आहे. निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाचा उंबरठा झिजवत आहे. मात्र गावकऱ्यांच्या मागणीकडे आजतागायत दुर्लक्ष करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबिले आहे. आता तर विसापूरकरांनी आंदोलन करुन रेती वाहतूक बंद करण्याचा सज्जड इशारा प्रशासनाला दिला आहे.विशेष म्हणजे, चंद्रपूरच्या वेकोलि प्रशासनाने माना कोळसा खाणीला सुराणा नामक कंत्राटदाराच्या माध्यमातून रेतीचा पुरवठा केला जातो. नांदगाव कॉलरीला मुलचंद नावाचा कंत्राटदार रेतीची वाहतूक करतो. सदर कंत्राटदारांनी नियमाला डावलून जेसीबी मशिनद्वारे वर्धानदीच्या पात्रातून रेतीचे उत्खनन सुरु केले आहे. आजघडीला कोलगाव घाटावर दोन जेसीबी मशीन उत्खननासाठी तैनात असून नदीच्या पात्रात ठिकठिकाणी खोल खड्डे करण्याचे पातक कंत्रासदार करीत आहेत. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.विसापूर ते वर्धा नदी कोलगाव घाट रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण झाल्याशिवाय आणि लगतच्या शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबत भरपाई वेकोलि व महसूल प्रशासनाने दिल्याशिवाय रेतीचे वाहतूक करु दिली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, उपसरपंच सुनिल रोंगे, सदस्य अशोक थेरे, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, माजी सरपंच गोविंदा पोडे, उपसरपंच मल्लेश कोडारी यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
वेकोलिच्या रेती वाहतुकीमुळे पिके करपली
By admin | Updated: November 23, 2015 01:00 IST