पे्रत सापडले होते नदीत : जुन्या वादातून घडले हत्याकांड चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पात्रात सागर गोवर्धन या युवकाचे प्रेत आढळले होते. त्याचा नैसर्गिक मृत्यू नसून खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. अवैध व्यवसायातील वादातून त्याची हत्या झाली असल्याचे पोलिसांचे मत आहे. २ आगस्टच्या दुपारी झरपट नदीच्या पात्रात पोलिसांना एक प्रेत आढळले होते. तपास घेतला असता ते सागर गोवर्धन या युवकाचे असल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे घटनेच्या तीन दिवसांपासून तो घरून बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, सागरची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून तो अवैध दारूचा व्यवसाय करायचा. काही दिवसांपूर्वी व्यवसायाच्या कारणावरून त्याचा महाकाली परिसरातील युवकांशी वाद झाला होता. त्यात सागरने एकावर तलवारीने हल्ला केला होता. या प्रकरणी त्याच्यावर शहर पोलिसांत कलम ३०७ नुसार गुन्हाही दाखल आहे. यामुळे त्याचे विरोधक चिडलेले होते. यातूनच चार जणांंनी मिळून त्याचा काटा काढला. त्यानंतर प्रेत नदीपात्रात फेकून दिले. पोलिसांनी चारही आरोपींविरूद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून चारही जण फरार आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शहर पोलिसांच्या हद्दीत पुन्हा खुनाचा गुन्हा उघडकीस
By admin | Updated: August 5, 2016 00:52 IST