चंद्रपूर : मागील सहा आठवड्यांपासून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपले थकीत वेतन, तसेच इतर मागण्यांना घेऊन असहकार आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, सोमवारी सेवाशर्ती कायद्याचे दहन करून आपला निषेध नोंदविला.
चार वर्षांपासून वेतनातील अनियमितता, शासनाच्या नियमानुसार महागाई भत्ता न लावणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रच्युईटी न देणे, नियमाबाह्य पद्धतीने वार्षिक वेतनवाढ थाबंविणे, बँक, एलआयसी, पतसंस्था, तसेच इतर ठिकाणी कर्मचाऱ्यांचे हप्ते वेळेवर न भरणे, तसेच मनमर्जीने वेतन कपात अशा अनेक समस्यांमुळे येथील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांनी प्रशासन आणि व्यवस्थापन मंडळाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एक दिवस लाक्षणिक संप केला. यानंतरही दखल न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला.