शहरी नागरिक वंचित : ७६ टक्क्यांऐवजी १०० टक्के ग्रामीण भागातीलच लाभार्थीचंद्रपूर : अन्न सुरक्षा योजनेतून गरजुंना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महत्त्वकांक्षी योजनेत बिपीएल कार्डधारक आणि ग्रामीण क्षेत्रातील ७६ टक्के एपीएल कार्डधारकांचा समावेश करण्यात यावा, असे शासकीय संकेत आहेत. असे असतानाही चंद्रपूर कार्यालयातील ग्रामीण पुरवठा निरीक्षकांनी कायदा धाब्यावर बसवून ग्रामीण भागातील १०० टक्के ए.पी.एल. कार्ड धारकांचा समावेश अन्न सुरक्षा योजनेत केला आहे. यासाठी प्रति कार्ड २०० रुपये स्वस्त धान्य दुकानदाराकडून वसूल करण्यात आल्याची माहिती आहे. अन्न सुरक्षा योजनेमध्ये चंद्रपूर तालुक्यातील फक्त ग्रामीण भागातील ए.पी.एल.कार्डधारकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. वास्तविक ही योजना शहरी व ग्रामीण भागासाठी होती. परंतु शहरी भागातील एकही कार्ड या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. ग्रामीण भागातील दुकानदार ए.पी.एल. कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याचे सांगून अन्न सुरक्षा योजनेतील शिल्लक राशन खुल्या बाजारात विकून खुलेआम काळा बाजार करीत आहे. सदर बाब तालुका निरीक्षक यांना माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेतील धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करणाऱ्या ग्रामीण तालुका निरीक्षक व स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी केल्यास फार मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे. सन २०१३ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने बीपीएल आणि एपीएल कार्डधारकांसाठी सवलतीच्या दरात धान्य पुरवठा करण्यासाठी अन्न सुरक्षा योजना सुरू केली. या महत्त्वकांक्षी योजनेत बिपीएल कार्डधारक आणि ग्रामीण क्षेत्रातील ७६ टक्के एपीएल कार्डधारकांचा समावेश करण्यात यावा, अशी स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना चंद्रपूर जिल्ह्यात काही भ्रष्ट अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारांसाठी ‘कुरण’ ठरले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समजते. ग्रामीण भागातील १०० टक्के एपीएल कार्ड अन्न सुरक्षा योजनेत नियमबाह्य समाविष्ट करण्यात आले असून यातून ग्रामीण तालुका निरीक्षकांनी मोठ्या प्रमाणात माया जमविल्याचा आरोप आर.टी.आय. कार्यकर्ते शिशुपाल रामटेके यांनी केला आहे. अन्न सुरक्षा योजनेतील समाविष्ट असलेल्या एपीएल कार्डधारकांचा धान्य साठा नियमितपणे दुकानदारांना वाटप करण्यात येतो. परंतु तो कार्डधारकांना विकण्याऐवजी जास्त दराने खुल्या बाजारात विकल्या जात असल्याने केंद्र सरकारच्या एका चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्ट कर्मचाऱ्यामुळे झाला आहे. (शहर प्रतिनिधी)लाभार्थ्यांच्या धान्याची बाजारात विक्रीएपीएल कार्डधारकांचा जानेवारी २०१५ पासून धान्य कोटा थांबविण्यात आला आहे. ही बाब समोर करून ग्रामीण स्वस्त धान्य दुकानदार अन्न सुरक्षा योजनेतील एपीएल कार्डधारकांना ‘तुमच्या कार्डावरील धान्य बंद झाल्याचे सांगून त्यांच्या हक्काचे धान्य खुल्या बाजारात विकत आहेत. काही ठिकाणी एपीएल कार्डधारकांना धान्य दिले जाते. मात्र ते जादा दराने दिले जाते.
अन्न सुरक्षा योजनेत घोळ
By admin | Updated: July 5, 2015 00:56 IST