चंद्रपूर : १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या विधानसभा मतदानाची मतमोजणी रविवारी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात येणार असून प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. मतमोजणी दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.मतमोजणीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघासाठी एकुण १०२ मतमोजणी निरीक्षक, १०२ मतमोजणी सहायक निरीक्षक, ११२ सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यात राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी १७ मतमोजणी निरीक्षक, १७ मतमोजणी सहायक, १७ सुक्ष्म निरीक्षक, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी १६ मतमोजणी निरीक्षक, १६ मतमोजणी सहायक, १९ सुक्ष्म निरीक्षक, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी १६ मतमोजणी निरीक्षक, १६ मतमोजणी सहाय्यक, २० सुक्ष्म निरीक्षक, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रासाठी १७ मतमोजणी निरीक्षक, १७ मतमोजणी सहायक, १८ सुक्ष्म निरीक्षक, चिमूर विधानसभा क्षेत्रासाठी १८ मतमोजणी निरीक्षक, १८ मतमोजणी सहायक, २० सुक्ष्म निरीक्षक व वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी १८ मतमोजणी निरीक्षक, १८ मतमोजणी सहायक, १८ सुक्ष्म निरीक्षक असे एकूण ३१६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.राजुऱ्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शंतनू गोयल, चंद्रपूरचे संजय दैने, बल्लारपूरचे रवींद्र खंजाजी, ब्रह्मपुरीचे दीपा मुधोळ, चिमूरचे विजय उरकुडे व वरोराचे निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी. लोंढे हे आहेत. गुरुवारी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची सरमिसळ निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी मतमोजणी केंद्रासमोर गर्दी करू नये तसेच शांतता व सुव्यवस्था कायम राखावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
मतमोजणीला प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबल
By admin | Updated: October 18, 2014 01:17 IST