लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोरोनाचे संकट अचानक उभे राहिल्याने राज्यात शासनाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे मागील महिन्यांपासून सर्वच कामकाज ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला कापूस घरीच ठेवावा लागला. मात्र शासनाने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शेतीकामांसह शेतमाल विक्री करायला परवानगी दिली आहे. परंतु राजुरा तालुक्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.शेतकरी नेहमीच या ना त्या कारणाने अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना कुणाचीही साथ उरली नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने कापूस खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. राजुरा, कोरपना तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने कापसाची प्रतवारी घसरल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर चार हजार ५०० रुपयांपासून अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.खासगी व्यापारी एवढया मोठया प्रमाणात कापसाची अक्षरश: लूट करीत असल्याने कोणत्याही जबाबदार लोकप्रतनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केली नाही.शेतकºयांचा कुणी वाली उरला नसल्याने शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही. क्विंटलमागे दोन ते तीन हजारांच्या मोठया फरकाने कमी दर देऊन शेतकऱ्यांचे पांढरे सोने अक्षरश: लुटले जात आहे. कापूस पिकावर मोठया प्रमाणात खर्च असताना तीन हजारापर्यंत एवढया कमी दरात शेतकऱ्यांनी कापूस विकला तर यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची दुर्दैवी वेळ आल्याशिवाय राहणार नाही.सीसीआय कापूस संकलन केंद्र सुरू करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र राजुरा, कोरपना तालुक्यातील शासकीय कापूस संकलन केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सीसीआयची शासकीय कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सीसीआयची कापूस खरेदी तातडीने सुरू कराखासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत कापसाची अक्षरश: कमी दरात लूट करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसावर केलेला खर्चही भरून निघत नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असून शासनाने तातडीने सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.खासगी जिनींगवर कापसाला कमी दर देऊन खासगी व्यापारी कापसाची कवडीमोल भावात खरेदी करीत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. -सुधाकर गेडेकर, शेतकरी,पाचगाव.