चंद्रपूर : मकरसंक्रातीनीमित्त महिला हळदीकुंकू कार्यक्रम तसेच एकमेकींना वाण देतात. यासाठी प्रत्येक महिला घराबाहेर पडत आहे. परंतु वाण देताना कोरोना पसरणार तर नाही ना, असा प्रश्न प्रत्येकीच्या मनात उपस्थित होत आहे. कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ८९ हजार ४९९ एकूण नमुने तपासण्यात आले. त्यातील २२ हजार ८५२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. औषधोपचारानंतर यातील २२ हजार २०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत २६२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत ३८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना संकटावर काही प्रमाणात प्रतिबंध आला असला तरी हे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही नागरिकांना वेळोवेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. असे असले तरी मकरसंक्रांतीसाठी मोठ्या प्रमाणात महिला घराबाहेर पडत आहेत. यावेळी मास्क न लावताच एकमेकींना वाण देत आहेत. काही महिला तर सार्वजनिक स्थळावर हळदीकुुंकवाचा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. अनेकवेळा गर्दीही होत आहे. त्यामुळे हळदीकुंकू करा, मात्र जरा जपून, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
लस आली मात्र धोका कायम
हळदीकुुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त महिला मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहे. कोरोना लस आल्यामुळे बहुतांश जण बिनधास्त झाले आहेत. मात्र धोका अद्यापही कायम आहे. घराबाहेर जाताना मास्क लावा, वेळोवेळी हात धुणे गरजेचे आहे. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. यासंदर्भात आरोग्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन
करणे अत्यावश्यक आहे.
कोरोना पसरतोय
रुग्ण मृत्यू
१४ जानेवारी २२ ००
१५ जानेवारी ४१ ००
१६ जानेवारी ०९ ०१
१७ जानेवारी २२ ००
१८ जानेवारी ०२ ०१