ब्रम्हपुरी : घरी शौचालय असूनही उघड्यावर शौचास जाणे सुरू असल्याचे चित्र ब्रम्हपुरीच्या तालुक्यातील काही गावांमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडत आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांमध्ये तालुक्यातील चारही बाजूंची गावे आघाडीवर आहेत. या गावांमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच गावाच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यालगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
गावागावातील नागरिकांना शासनाने शौचालय बांधण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा यासाठी जनजागृतीही केली आहे. उघड्यावर शौचास जाणे बंद व्हावे यासाठी प्रशासनच्यावतीने गुडमॉर्निंग पथकांची निर्मितीसुद्धा करण्यात आली होती. यावेळी काहींवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आली. ही मोहीम जोपर्यंत सुरू होती तोपर्यंत नागरिकांनी शौचालयाचा पुरेपूर वापर केला. मात्र ही मोहीम थंडावताच नागरिकांनी पुन्हा उघड्यावर शौचास जाणे सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाने इतर कामे सोडून मोहीम वर्षभर राबवावी अशी मागणी केली जात आहे.
गोवऱ्या व ईतर साहित्य ठेवण्यासाठी वापर
काही गावांमध्ये शौचालयाचा गोवऱ्या तथा घरातील निरुपयोगी इतर साहित्य व शेतीउपयोगी अवजारे ठेवण्यासाठी वापर करीत आहे. शौचालयांच्या साफसफाईअभावी काही गावातील शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
निर्मल ग्राम नावापुरतेच
हागणदारीमुक्त गाव अभियानाला २०१३ पासून वेग आला. त्यातच शासनाने निर्मल ग्राम अभियान राबवून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना रोख बक्षिसे व अतिरिक्त विकास निधीही दिला. मात्र, प्रशासनाची पाठ फिरताच ग्रामीण भागातील कचरा व घाणीची अवस्था जैसे थे झाली आहे. त्यामुळे शासनाचे निर्मल ग्राम अभियान नावापुरतेच असल्याचे चित्र आहे.