चंद्रपूर: अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा १३१ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी व विदर्भ विकास मजदूर काँग्रेसच्या वतीने १३१ ब्लँकेटस व १३१ किलो तांदळाचे वाटप करण्यात आले. तर चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीकडूनही कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे दोन्ही कार्यक्रम वेवगळ्या ठिकाणी पार पडले.काँग्रेसचे ज्येष्ट नेते नरेश पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव तथा नगरसेवक अशोक नागापूरे, प्रविण पडवेकर, संजय महाडोळे, मनपाचे गटनेता प्रशांत दानव, बल्लारपूरच्या नगराध्यक्षा छाया मडावी, घनश्याम मुलचंदानी, गटनेता देवेंद्र आर्या, चंद्रशेखर पोडे यांच्या हस्ते गुरुमाऊली मंदिर, महाकाली मंदिर, पागलबाबा नगर इत्यादी परिसरात प्रत्यक्ष जाऊन भिक्षूक, फकीर व उघड्यावर संसार थाटून असणाऱ्या गरीब व गरजू लोकांना १३१ ब्लँकेटचे व १३१ किलो तांदळाचे वाटप केले.तत्पूर्वी काँग्रेस कार्यालयात नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत काँग्रेसने केलेल्या देशातील विविध विकास कामांसंबंधी व गोरगरीब दलित पीडितांच्यासाठी राबविलेल्या विकास योजनांची माहिती त्यांनी दिली. दुसरा कार्यक्रम शहर काँग्रेस कमेटीच्या कार्यालयात पार पडला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुभाषसिंह गौर यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना ही भारत देशाच्या स्वातंत्र्यांची चळवळ होती. या चळवळीतून अनेक महात्मा आणि हुतात्मांनी लढा दिल्याचे सांगितले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक बांगडे, सेवादल अध्यक्ष प्रमोद राखुंडे यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाचा इतिहास आणि देशाची विकासाची वाटचाल यावर भर घातली.चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू संभाजी नागरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन पक्षवाढीसाठी सवारंनी पुढे येण्याचे आवाहन केले. पक्षामध्ये आयाराम गयाराम भरपूर आहे. मात्र कुणाचीही पर्वा न करता प्रत्येक काम एकजुटीने करून पक्ष मजबूत करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा
By admin | Updated: December 29, 2015 20:17 IST