नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या विद्या कांबळे : उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सचिन भोयरगडचांदूर : गडचांदूर नगरपरिषदेसाठी आज शुक्रवारी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर पालिकेवर काँग्रेस-सेना-भाजपाचा झेंडा फडकला आहे. गडचांदूर नगर परिषदेच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या विद्या शुद्धोधन कांबळे यांची निवड झाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शांताबाई मोतेवाड यांचा १० विरूद्ध ७ मतांनी पराभव केला.भाजप, सेनेच्या मदतीने काँग्रेसने विजय मिळविला असून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळाले आहे. गडचांदूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सात, काँग्रेस पाच, भाजपा तीन व शिवसेना दोन, असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड समजण्यात येत होते. ही निवडणूक भाजपाचे आमदार संजय धोटे, काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. भाजपाला गडचांदूरकरांनी नाकारले असले तरी तीन नगरसेवक असल्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांची अतिशय महत्वाची भूमिका होती. पक्षाचा आदेश झुगारून स्थानिक राजकारणात त्यांनी काँग्रेसला मतदान केल्यामुळे काँग्रेसला सत्तेचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेचे नगरसेवक तथा उपजिल्हाप्रमुख सचिन भोयर सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या बाजुने होते.सचिन भोयर गडचांदूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी भाजपच्या आनंदीबाई मोरे यांचा १० विरूद्ध ७ मतांनी पराभव केला.आनंदीबाई मोरे यांनी स्वत:चे मत शिवसेनेच्या सचिन भोयर यांना दिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपली मते भाजपाच्या आनंदीबाई मोरे यांना दिली. त्यामुळे मोरे यांना ७ मते मिळाली. काँग्रेसचे पापय्या पोन्नमवार, सागर ठाकुरवार, विद्या कांबळे, अरूणा बेतावार, रेखा धोटे, भाजपच्या आनंदीबाई मोरे, हरिभाऊ मोरे, मधुकर कोवळे व शिवसेनेचे सचिन भोयर, चंद्रभागा कोरवते आदींनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. (शहर प्रतिनिधी)आमदाराचा आदेश नाकारला४काँग्रेस-भाजप विधानसभा क्षेत्रात प्रतिस्पर्धी आहे. पुढे ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे काँग्रेससोबत सत्तेत बसणे योग्य होणार नाही म्हणून आमदार संजय धोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसा आदेश त्यांनी आपल्या तिन्ही नगरसेवकांना देऊन निवडणुकीच्या सभागृहापर्यंत सोडले. मात्र स्थानिक राजकारणात भाजप व सेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचे होते. त्यामुळे आमदार संजय धोटे यांच्या आदेशाला झुगारून भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान करून आमदार संजय धोटे यांच्या नेतृत्वाला धक्का दिला.