चंद्रपूर : शेकडो वर्षे शोषणाचा बळी ठरलेल्या आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता काँग्रेस कटिबद्ध आहे. आदिवासींनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन शैक्षणिक, मुलभूत व आर्थिक योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे मत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरीच्यावतीने आयोजित आदिवासी समाजप्रबोधन व सर्वधर्मीय सामूहिक विवाहाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजीवसिंह चंदेल, सुरेश चौधरी, गौतम झाडे, श्रीनिवास कंदनुरीवार, सभापती हर्षलता चांदेकर, राजेश कवटे, शैलेश बैस, रामचंद्र कुरवटकर, शिला बांगरे, वनिता वाघाडे, पिसाजी कुडमेथे, मोतीराम कुडमेथे, प्रमोद बोरीकर, रवींद्र शेडमाके यांची उपस्थिती होती. प्रबोधन कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांकरिता असलेल्या आदिवासी विकास महामंडळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तसेच आदिवासींकरिता खावटी कर्ज, घरकुलाची योजना, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, सूवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, शासकीय, अनुदानित आश्रमशाळा समूह योजना, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी, परिक्षा फी प्रतीपूर्ती करणे, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना पीव्हीसी, एचडीपीई, पाईपचा पुरवठा करणे, ठक्करबाबा आदिवासी वस्ती सुधारणा, कन्यादान योजना अशा बऱ्याच योजनांची माहिती देण्यात आली. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात विविध जाती धर्माचे ४५ जोडपी विवाहबद्ध झाले. संचालन संतोष लांडे यांनी तर प्रास्ताविक सरपंच साईनाथ कोडापे यांनी केले.आभार अमोल मारशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन बाबुराव शेडमाके आदिवासी बहुउद्देशिय संस्था वामनपल्ली आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांनी संयुक्तरित्या केले होते. कार्यक्रमास गोंडपिपरी तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बाबुराव शेडमाके बहुउद्देशीय आदिवासी संस्था वामनपल्लीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)
आदिवासींच्या विकासाकरिता काँग्रेस कटिबद्ध
By admin | Updated: July 23, 2014 23:32 IST