मूल : राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मूल तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तारूढ पक्षाला जनतेने नाकारत सत्ता परिवर्तन घडवून आणल्याचे दिसून आले. मतदारांनी आठ ग्रामपंचायतींवर शिवसेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी व युवा परिवर्तन आघाडीने आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेसने १४, तर भाजपने १३ ग्रामपंचायतींवर आपला हक्क सांगितला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने भादुर्णी, राजोली, चिखली, मोरवाही, मरेगाव, चिमढा, चांदापूर, चिरोली, खालवसपेठ, दाबगाव मक्ता, नांदगाव गांगलवाडी, कोसंबी या ग्रामपंचायतींवर आपली सत्ता सांगितली आहे, तर भाजपने मारोडा, काटवन, मुरमाडी, डोंगरगाव, बोरचांदली, फिस्कुटी, वीरई, गोवर्धन, हळदी, पिपरी दीक्षित, जुना सुर्ला, नवेगाव भूजला, बोडाळा बुज ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. यात विशेष म्हणजे आठ गावांत जनतेने नवीन पक्ष व आघाडीला झुकते माप देत परिवर्तन घडवून आणल्याचे दिसून आले. यात शिवसेनेने भवराळा, सुशी, वंचित बहुजन आघाडीने केळ्झर, आम आदमी पार्टीने चितेगाव, तर गावात एकत्र येऊन तयार केलेल्या युवा परिवर्तन आघाडीने टेकाडी, जानाळा, चिचाळा, येरगाव या गावांत सत्ता मिळविली.