वरोरा : वरोरा पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी श्री रामदेवबाबा स्वामी शंकर देव यांच्याविरूद्ध न्यायालयाच्या आदेशाने विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करताना रामदेवबाबांच्या नावामध्ये संभ्रम निर्माण झाल्याची माहिती समोर आल्याने या संभ्रमावरून रामदेव बाबांना अटक होईल की नाही, अशी शंका तक्रारकर्त्याने उपस्थित केली आहे.योगगुरू मानले जाणारे श्री रामदेव बाबा स्वामी शंकर देव (६०) रा. पतंजली योगपीठ हरिद्वार उत्तराखंड यांनी २५ एप्रिल २०१४ रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे दलित समाजाबाबत अपशब्द वापरले होते. त्यामुळे समाजाच्या भावना दुखाविल्या असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विनोद खोब्रागडे यांनी वरोरा येथील न्यायालयात एका याचिकेद्वारे केली होती. न्यायालयात नुकतेच वरोरा पोलीस ठाण्याला रामदेवबाबांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाने वरोरा पोलिसांनी रामदेवबाबाविरूद्ध कलम १५३ (अ), २९८, ५०४, ५०५ व अ.जा. अ.ज. प्रतिबंध कायदा सन १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये ‘श्री रामदेव बाबा स्वामी शंकर देव’ असे नाव असताना एफआयआरमध्ये ‘श्री रामदेव बाबा स्वामी शंकरदेव’ असे करण्यात आले. त्यानंतर ही चुक लक्षात येताच ‘शंकर देव’ ऐवजी ‘शंकरदेव’ असेही करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एफआरमधील माहिती संभ्रम निर्माण करणारी असल्याने तपास करणारे पोलीस ज्या रामदेवबाबाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे, त्यांच्यापर्यंत पोहचतील काय, असा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल होत असताना नावामध्ये एफआरवर तफावत आल्याने या तपासाबाबत तक्रारकर्ते विनोद खोब्रागडे यांनी शंका उपस्थित करीत यामध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाई करावी व रामदेवबाबा यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
एफआयआरमधील नावात संभ्रम
By admin | Updated: September 17, 2014 23:42 IST