घुग्घुस : घुग्घुस नगर परिषदेची अधिसूचना जाहीर होऊन सहा दिवस झाले. मात्र, अद्यापही नगर विकास विभागाने नियुक्त केलेल्या प्रशासकाने पदभार सांभाळला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. मागील ३२ वर्षांपूर्वी घुग्घुस ग्रामपंचायतची पहिली अधिसूचना निघाली. मात्र, ती हवेतच विरली. दरम्यान, यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी करण्यात आली. मात्र, येथील एक राजकीय पक्ष सोडून सर्व पक्ष, सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्थांनी आंदोलन करीत नगरपरिषदेची मागणी लावून धरली. ३० ऑगस्टला महाआघाडी सरकारने घुग्घुस नगर परिषदेबाबत अधिसूचसना जारी केली. यासंदर्भात शासन प्रशासनाच्या प्रक्रिया सुरू असताना ११ सप्टेंबरला राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना काढली. यामध्ये घुग्घुसचाही समावेश असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला. त्यानंतर राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांनी नगरपरिषदेची मागणी लावून धरली. दररोज विविध आंदोलने करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर ३१ डिसेंबरला नगर विकास मंत्रालयाने नगर परिषदेच्या संदर्भात अधिसूचना काढली व नगर परिषदेची घोषणा केली. नगर परिषदेची यथोचित रचना होईपर्यंत चंद्रपूर तहसीलदाराची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांचे पत्र आले. मात्र, अद्यापपर्यंत तहसीलदारांनी पदभार सांभाळला नसल्याने नागरिकांतून तर्कवितर्क लावले जात आहेत.
घुग्घुस नगर परिषदेवर प्रशासन नसल्याने संभ्रम वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST