वरोरा : वनविभागाने शेतपिकात उपद्रव करणाऱ्या रानडुकर व रोह्याला ठार मारण्यासाठी वन विभागाकडे अर्ज केल्यास २४ तासांत परवानगी दिली जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु उपद्रवी रानडुकर व रोह्याला कशाने मारावे, याबाबत स्पष्ट सुचना देण्यात आल्या नसल्याने वनविभागासह शेतकरी संभ्रमात सापडले आहे.मागील काही वर्षांत वन्यप्राण्यांनी शेतातील उभ्या पिकाची नासाडी करून शेतकऱ्यांना आणले. याबाबतच्या तक्रारीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी रानडुक्कर व रोह्यास ठार मारण्याची परवानगी मागितली होती. त्याची दखल घेत वनविभागाने रानडुक्कर व रोही या वन्यप्राण्यांना ठार मारण्याकरिता वनविभागाकडे अर्ज केल्यास २४ तासांच्या आत परवानगी दिली जाईल. अर्ज येवून २४ तास झाले आणि परवानगी दिली नाही तर परवानगी ग्राह्य धरली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेपासून पाच किमी सभोवतालच्या क्षेत्रात कुठल्याही परिस्थितीमध्ये रानडुक्कर व रोहीला ठार मारण्याची परवानगी दिली जाणार नाही. रानडुक्कर व रोही ठार मारल्यानंतर त्याची विल्हेवाट वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष लावली जावी. उपद्रवी रानडुक्कर व रोह्याला ठार करण्याकरिता वनविभागाकडे अर्ज केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने त्या अर्जासंबंधीची पोचपावती घेणे बंधनकारक करण्यात आले. उपद्रवी रानडुक्कर व रोह्यास कशाने ठार करावे याबाबत वनविभागाच्या परिपत्रकात स्पष्ट सूचना देण्यात आली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. एखाद्या शेतकऱ्यास रानडुकर व रोहला ठार मारले तर ते कशाने मारले, याची तपासणी कशी करावी असे एक ना अनेक प्रश्न वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यापुढे नव्याने उभे ठाकले आहे. (तालुका प्रतिनिधी)
रानडुक्कर व रोह्याला मारण्याच्या परवानगीबाबत संभ्रम
By admin | Updated: November 15, 2015 00:35 IST