तज्ज्ञांचे मार्गदर्शन : दुर्बल गटातील ४३ मुलींचा सहभाग चंद्रपूर : आयएमएच्या महिला शाखा अध्यक्ष डॉ. प्रेरणा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘निर्जरा’ प्रकल्पावर कार्यशाळेचे आयोजन स्थानिक गंजवार्डार्तील आयएमए सभागृहात १५ मेपासून करण्यात आले होते. त्याचा समारोप नुकताच करण्यात आला. या कार्यशाळेत १३ ते १७ वयोगटातील ४३ मुली सहभागी झाल्या होत्या.या कार्यशाळेला प्रा. मनोहर सप्रे, आशिष देव व इतर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. समाजातील गरीब मुली आत्मनिर्भर होण्याकरिता त्यांचे सबलीकरण करण्याच्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींना योग, स्वसंरक्षण, कौशल्यविकासांतर्गत ब्युटी पार्लर, मेहंदी, एम्ब्रायडरी प्रशिक्षण, महिलांचे कायदेविषयक सल्ला, शरीर रचनेविषयी माहिती, आहार, बँकिंग, वेळेचे व्यवस्थापन, आरोग्य तपासणी, व्यक्तिमत्त्व विकास, स्वच्छता, शिक्षण आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय टेबल मॅनर संस्कृती, स्टेज डेअरिंग व स्पिकिंग, सायबर क्राईम, लैंगिक शिक्षण, मीडिया व सोसायटी, मैत्रीभाव, सामाजिक जाणीव, बचतगट, स्त्रीभृणहत्या, सामूहिक कार्य, प्रथमोपचार, वृक्षारोपण आदीबाबत माहिती देण्यात आली. विविध विषयांवर विविध दिवशी पुस्तके, होमेटॉनिक, ब्युटी पार्लरचे साहित्य, वृक्षरोपे आदींचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षणार्थी मुलींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे तर प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, आशिष देव, आयएमएचे सचिव डॉ. पीयूष मुत्यालवार, डॉ. कल्याणी दीक्षित आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महिला शाखा उपाध्यक्ष डॉ. नर्शिन मावानी, उपसचिव डॉ. शिल्पा मुनगंटीवार, सहसचिव डॉ. ऋजुता मुंधडा, ‘निर्जरा’ प्रकल्पाच्या संचालिका डॉ. शर्मिली पोद्दार, डॉ. मनीषा घाटे, डॉ. पल्लवी इंगोले, डॉ. प्रीती चव्हाण यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)
आयएमएच्या ‘निर्जरा’ कार्यशाळेचा समारोप
By admin | Updated: June 21, 2016 00:45 IST