नागरी (रेल्वे) : वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. शासन निर्णयात संगणक परिचालकांचे मानधन आठ हजार रुपये नमूद केले आहे. परंतु, शासननिर्णयानुसार मानधन दिले जात नसल्याने परिचालकांची पिळवणूक होत आहे.जुलै- आॅगस्ट महिन्यापासून ४५० आॅनलाईन नोंदी करा, नाही तर घरी जा असे महाआॅनलाईन कंपनीने सुनावले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यातील ७८ संगणक परिचालकांपैकी ११ संगणक परिचालकांना महाआॅनलाईन कंपनीने कामावरुन काढून टाकले. यामध्ये महाआॅनलाईन कंपनीने कोणत्याही प्रकारचे कारणे दाखवा नोटीस किंवा संगणक परिचालकांच्या समस्या समजून न घेता कामावरुन काढून टाकले. संगणक परिचालकांची पीएसआयडी बंद केलेली आहे. याबाबत सर्व संगणक परिचालकांनी तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयक यांच्याशी संवाद साधला असता, ते कोणत्याही प्रकारची बाजू समजून घेत नाही. त्यामुळे जुलै महिन्यापासून सर्व संगणक परिचालकांचे मानधन थकले आहे.११ संगणक परिचालकांना जेव्हापर्यंत कामावर पूर्ववत देऊन थकलेले मानधन देत नाही तसेच तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरु राहील असा इशारा परिचालकांनी दिला आहे. संगणक परिचालकांनी महाआॅनलाईन तालुका समन्वयक, संवर्ग विकास अधिकारी, सभापती, उपसभापती, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. याची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी. (वार्ताहर)
संगणक परिचालक मागणीवर ठाम
By admin | Updated: September 22, 2014 23:16 IST