नागभीड : आज घोषित झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, आपल्याच पक्षाला बहुमत मिळाल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
नागभीड तालुक्यात ४३ ग्रा.पं.च्या निवडणुका होत्या. यातील दोन ग्रामपंचायती अगोदरच अविरोध निवडून आल्या होत्या. ४१ ग्रा.पं.साठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा सोमवारी निकाल घोषित करण्यात आला.
सोमवारी सकाळी ९ वाजेपासूनच उमेदवारांनी तहसील कार्यालय परिसरात गर्दी करणे सुरू केले होते. बरोबर १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. १०.३० वाजताच्या सुमारास नागभीड तालुक्यातील सर्वात मोठ्या व १७ सदस्यीय तळोधी ग्रामपंचायतीचा निकाल आला. या गावात ग्रामपंचायतीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. येथील अवस्था त्रिशंकू आहे. वाढोणा येथेही अशीच अवस्था आहे. मात्र सावरगाव येथे काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.
काँग्रेसने कानपा मोहाळी, बिकली पेंढरी, कोटगाव, विलम, पहार्णी, मौशी, बाळापूर खु., ढोरपा, पान्होळी, किरमिटी, मिंडाळा, पांजरेपार, कोसंबी गवळी, सावरगाव, कन्हाळगाव, सोनुली बु., वैजापूर, वलनी, चारगावसह २५ ग्रामपंचायती काँग्रेसकडे असल्याचा दावा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी केला आहे.
तर भाजपाकडे कोथुळना, विलम, म्हसली, चिंधीचक, जनकापूर, किटाडी (बो.), बोंड, बाळापूर (बुज.), देवपायली, पारडी ठवरे, नवेगाव हुंडेश्वरी, चिकमारा, वैजापूर, कोजबी माल, आकापूर यासह २२ ग्रामपंचायतीवर भाजपाला बहुमत प्राप्त झाल्याचा दावा तालुका भाजपचे अध्यक्ष संतोष रडके यांनी केला आहे.
बाॅक्स
दोन्ही पक्षाचा दावा असलेल्या ग्रामपंचायती
तालुक्यातील तळोधी, वाढोणा, विलम, पळसगाव खुर्द, कोर्धा, नांदेड, बाळापूर खुर्द, पेंढरी या ग्रामपंचायतींवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दावा केला आहे.
बाॅक्स
पती-पत्नी विजयी
तालुक्यातील बोंड ग्रामपंचायतीमध्ये दोन पती-पत्नीच्या जोडींनी विजय प्राप्त केला आहे. अशोक कोहपरे आणि त्यांच्या पत्नी कुसुम अशोक कोहपरे व जयतराम सिडाम आणि त्यांच्या पत्नी निशा जयतराम सिडाम अशी त्यांची नावे आहेत. अशीच पती-पत्नीची जोडी पेंढरी ग्रा.पं.मध्ये निवडून आल्याची माहिती आहे.
बाॅक्स
२१ वर्षाची तरुणी, ७१ वर्षाच्या आजीबाई
तालुक्यातील कोजबी माल या ग्रामपंचायतीत सोनम नरेश शेंडे ही २१ वर्षाची तरुणी तर शेवंता सोमा भोयर या ७१ वर्षाच्या आजीबाई निवडून आल्या आहेत. त्यांचा विजय लोकांच्या चर्चेचा विषय झाला आहे.