पाणीपुरवठा योजना पूर्ण करा; नंतरच हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:19+5:302021-01-22T04:26:19+5:30

आशिष देरकर कोरपना : गडचांदूर येथे १० कोटी ३५ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत पांढरा हत्ती बनली आहे. तब्बल ...

Complete water supply scheme; Only after transfer | पाणीपुरवठा योजना पूर्ण करा; नंतरच हस्तांतरण

पाणीपुरवठा योजना पूर्ण करा; नंतरच हस्तांतरण

Next

आशिष देरकर

कोरपना : गडचांदूर येथे १० कोटी ३५ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत पांढरा हत्ती बनली आहे. तब्बल नऊ वर्षानंतरही योजना पूर्णत्वास आली नसल्याने गडचांदूरवासीयांची तहान भागविण्यास सदर पाणीपुरवठा योजना असमर्थ ठरली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाकडून ही योजना नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू असून जीवन प्राधिकरणाकडून नगर परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार होत आहे. मात्र अपूर्ण योजना हस्तांतरित करून घेण्यास गडचांदूर नगर परिषद तयार नसून नगर परिषदेने कठोर भूमिका घेतली आहे.

अपूर्ण योजना हस्तांतरित करून घेतल्यास गडचांदूर नगर परिषदेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून यामध्ये कंत्राटदाराला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सदर पाणीपुरवठा योजनेचे काम नागपूर येथील जी.आर. जयस्वाल या कंत्राटदाराकडे असून योजनेत अनेक त्रुटी आहे.

दरवर्षी गडचांदुरात पाणीटंचाई भासत असून यापासून शहरवासीयांची कायमची मुक्तता व्हावी यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी सन २०१२ मध्ये १० कोटी ३५ लाख रुपये मंजूर करून शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना मंजूर केली. प्रभाग २ मधील ओपन स्पेसवर १२ लाख ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली. अमलनाला धरणातून पाणी घेतल्यानंतर ते पाणी शुद्ध होऊन जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याच्या टाकीत घेतल्या जाते.

त्या माध्यमातून संपूर्ण शहरभर शुद्ध पाण्याचे वितरण करण्याकरिता घरोघरी कनेक्शन देणे आवश्यक आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून शहरातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचतील यादृष्टीने पाईपलाईन टाकण्याचे काम व्हायला हवे होते. मात्र ही योजना पूर्णत्वास आणण्याकरिता तब्बल नऊ वर्ष लागल्याने कामावर नियंत्रण ठेवणारे अनेक सुपरवायझर बदलण्यात आले. त्यामुळे कोणती पाईपलाईन कोणत्या ठिकाणी टाकली आहे. पुढे ती कोणत्या पाईपलाईनला जोडल्यास पाणी समोर पोहोचेल, हे नवीन काम करणाऱ्या लोकांना माहीत नसल्याने शहरात या योजनेचा फज्जा उडाला आहे.

कोट

अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार कंत्राटदाराने काम पूर्ण करून दिल्यास नगर परिषद पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्यास तयार आहे. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याची अंदाजपत्रकानुसार जबाबदारी कंत्राटदाराची आहे. मात्र एकदा योजना हस्तांतरित झाली की, घरोघरी पाईपलाईन पोहोचवण्याची जबाबदारी नगर परिषदेला पार पाडावी लागणार आहे. म्हणून अपूर्ण पाणी पुरवठा योजना हस्तांतरणाला आमचा विरोध आहे.

- सविता टेकाम, नगराध्यक्ष,

कोरपना.

बॉक्स

दीड लक्ष लिटर क्षमतेची टाकी

सध्या गडचांदुरात जुन्या दीड लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतूनच शहरातील एकूण पाच प्रभागांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शहरवासीयांना प्रतिव्यक्ती मुबलक पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे दिसते. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन पाण्याच्या टाकीतून जुन्या पाण्याच्या टाकीला कनेक्शन जोडण्यात आले असून त्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र शहराची ८० टक्के लोकसंख्या जुनी पाण्याची टाकी असलेल्या एकूण पाच प्रभागात असून मग नवीन १२ लक्ष ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी काय कामाची, असा प्रश्न नागरिक करीत आहे. नवीन योजनेच्या टाकीतूनच संपूर्ण शहराला पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी आहे.

Web Title: Complete water supply scheme; Only after transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.