‘लोकमत’च्या पाठपुरावा यश : पालकमंत्र्यांचा पुढाकारभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव येथील उमा नदीवर ४० वर्षांपूर्वी बांधलेला आर्च काजवे प्रकारचा पूल होता. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात सतत पाणी वाहत असायचे. त्यामुळे तीन महिने या मार्गावरची वाहतूक ठप्प राहायची. याबाबत ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करून पुलाची समस्या शासनदरबारी मांडली. याची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूल बांधकामास मंजूरी दिली. या पूलाचे काम पूर्ण झाले असून शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण होणार आहे. पूलावरून वाहतूक बंद राहत असल्याने पावसाळ्यात परिसरातील १५ गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटत होता. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. लोकमतने सतत ही समस्या मांडल्याने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्ताची दखल घेतली. जिल्हा परिषदेकडे असलेला हा रस्ता इजिमा क्र.१३४ या दर्जाचा होता. मात्र सदर रस्ता बांधकाम विभागाकडे दर्जोन्नत करण्यात येऊन त्यास प्रजिमा २३ असे करण्यात आले व केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करुन भुपृष्ठ मंत्रालयाकडून पालकमंत्र्यांनी १० कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला.नागरिकांची समस्या लक्षात घेता ७ जानेवारी २०१५ ला पूलाचे काम सुरू झाले व मे २०१६ ला पूर्णत्वास आले. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या पुलाचे काम पुर्णत्वास आल्याने परिसरातील नागरिक आनंदीत आहेत. दहा कोटी रुपये खर्च करून केवळ पाच महिन्यातच काम पूर्ण झाले असून पुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. लोकमतच्या पाठपुराव्यामुळे पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण झाल्याने नागरिकांनी लोकमतचे आभार मानले आहे. (वार्ताहर)
उमा नदीवरील पूल पाच महिन्यात पूर्ण
By admin | Updated: June 25, 2016 00:40 IST