कोरोना काळात सर्व सीमा बंद होत्या. गावांमध्येही संचारबंदी होती. अशा आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना उपचारार्थ बाहेर जाणे धोक्याचे होते. अशा स्थितीत रुग्णांना घरूनच ॲप प्रणालीद्वारे डॉक्टरांकडून उपचार मिळावा याकरिता राज्य शासन यांच्यावतीने ई संजीवनी बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्यात आली. ई संजीवनी ॲप डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात माध्यम ठरेल. यावरून रुग्णांना त्यांच्या आजारावर घरबसल्या सेवा मिळू लागली. याप्रसंगी ही सेवा मुंबई-पुणे यापुरतीच मर्यादित होती. ती यशस्वी ठरली व आता राज्यात इतर ठिकाणी ती सुरू केली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात ई संजीवनी सेवा या आठवड्यापासून सुरू झाली आहे. ही सेवा सर्वांकरिता आहे. मोबाईल ॲपचा उपयोग करून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी रुग्णांना त्यांच्या आजारावर विनामूल्य उपचार घेता येणार आहे. चर्चेनंतर ई प्रिस्क्रिप्शन (औषध चिट्ठी) प्राप्त होईल. रुग्णांना त्या औषधीच्या दुकानातून विकत घ्यावे लागेल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या सेवेकरिताही डॉक्टर उपलब्ध असतील. बल्लारपूर रुग्णालयात ही सेवा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्पिता वावरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, डॉ. आशा साळवे, डॉ. सुकेशनी कांबळे बघत आहेत, अशी माहिती डॉ. वावरकर यांनी दिली आहे. रुग्णांनी ई संजीवनीच्या ॲपवरून संपर्क साधणे आवश्यक आहे.
बल्लारपुरात शासनाच्या ई संजीवनी आरोग्य सेवेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST