भटाळीजवळ रास्तारोको : भटाळी व सिनाळावासी झाले आक्रमकचंद्रपूर : वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा, नवेगाव, मसाळा, मसाळा तुकूम या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्याची प्रक्रिया विलंबाने पूर्ण करीत अखेर करारनामे केले खरे. मात्र अद्याप जमिनीचा मोबदला, नोकरी, पूनर्वसन केले नसल्याने संतप्त ग्रामवासीयांनी आज शनिवारी सिनाळा खाण बंद पाडली तर भटाळी ग्रामवासीयांनी वेकोलि व्यवस्थापन नोकऱ्या देण्यात विलंब करीत असल्याने चक्का जाम आंदोलन केले.वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा, नवेगाव, मसाळा, मसाळा तुकूम या आसपासच्या चार गावातील२६० हेक्टर जमीन २००८ मध्ये संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली. २०१२ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर वेकोलिद्वारे तब्बल तीन वर्षानंतर २८ मार्च २०१५ मध्ये २२५ शेतकऱ्यांचे करारनामे करून सहा महिन्यात शेतीचा मोबदला व नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र आज १६ महिने लोटूनही वेकोलि व्यवस्थापनाने अद्यापही जमिनीचा मोबदला व नोकरी दिली नाही. परिणामी गावातील नागरिकांना एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यातच गावाजवळ ही कोळसा खाण असल्याने येथील विहिरी, हातपंप कोरडे पडले आहेत. पाण्याच्या भीषण संकटानेही येथील नागरिक कंटाळले होते. वेकोलि व्यवस्थापन केवळ भुलथापा देऊन ग्रामवासीयांची पिळवणूक करीत असल्याने अखेर त्यांनी आज शनिवारी खाण बंद करण्याचा निर्णय घेतला.आज सकाळी चारही गावातील शेकडो नागरिकांनी सिनाळा कोळसा खाणीत उतरून खाणीचे उत्पादन बंद करीत संपूर्ण उत्पादन ठप्प केले. अखेर वेकोलि व्यवस्थापनाचे मुख्य महाप्रबंधक आभास सिंग, उपक्षेत्रीय प्रबंधक ए.पी.सिंग यांनी लेखी स्वरूपात लवकरच मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.भटाळी कोळसा खाणीच्या विस्ताराकरिता वेकोलिने तेथील लोकांच्या जमिनी संपादित केल्या. त्याचा पैशाच्या स्वरूपात मोबदला देण्यात आला. मात्र नोकरी देण्यास कमालीचा विलंब करीत असल्याने भटाळी ग्रामवासीयांनी २९ जुलैला खाण बंद पाडून आंदोलन केले होते. त्यांनतर त्यांनाही लवकरात लवकर नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र वेकोलि व्यवस्थापन प्रकल्पग्रस्तांवर जाचक अटी लादून नोकरीत सामावून घेण्यास जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज खाणीजवळ चक्का जाम आंदोलन केले. वृत्त लिहिस्तोवर हे आंदोलन सुरूच होते. तात्काळ नोकऱ्या न दिल्यास हे आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल, असा ग्रामवासीयांनी वेकोलि व्यवस्थापनाला इशारा दिला आहे. (वार्ताहर)पोलिसांचा समजावण्याचा प्रयत्नग्रामवासीयांची आक्रमक भूमिका बघून दुर्गापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र वेकोलि व्यवस्थापन मागण्याबाबत जोपर्यंत लिखित आश्वासन देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली.
कोळसा उत्पादन थांबविले
By admin | Updated: September 4, 2016 00:44 IST