जीवती येथील प्रकार : पालक म्हणतात, पुन्हा परीक्षा घ्याचंद्रपूर: जीवती येथील शासकीय आश्रमशाळेत ९ जानेवारीला पार पडलेल्या नवोदय प्रवेश परीक्षेदरम्यान, काही पालकांनी व या परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे प्रामाणिक परीक्षार्थ्यांचे लक्ष विचलित होऊन नेमून दिलेल्या वेळेत ते पेपर सोडवू शकले नाही. यातून त्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत काही संतप्त विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे. ९ जानेवारी रोजी जीवती येथील शासकीय आश्रमशाळेत नवोदय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मात्र परीक्षेदरम्यान, काही विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर कॉपी केली. मोबाईलद्वारे पेपरचे फोटो काढून ते बाहेर नेले जात होते. त्याची उत्तरे शोधून पेपरमध्ये लिहीली जात होती, अशी तक्रार जीवती तालुक्यातील बुद्धगुडा येथील रोशनी गौतम मोरे, सुगंधा बाबाराव कांबळे, सुयोग प्रेमलाल वाघमारे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम जीवतीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याकडे व नंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करून कारवाईची मागणी केली. (प्रतिनिधी)
नवोदय प्रवेश परीक्षेदरम्यान गोंधळ
By admin | Updated: January 13, 2016 01:10 IST