चंद्रपूर: इंटरनेट ई फार्मसीच्या माध्यमातून राज्यात व देशात बेकायदेशीर आॅनलाईन औषध विक्री सुरू असून या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवारी एक दिवसीय बंद पुकारला. त्यात चंद्रपूर जिल्हा औषध विक्रेता संघटनाही सहभागी झाली. येथे औषध विक्रेत्यांनी बुधवारी दुपारी येथील गांधी चौकातून मागण्यांच्या पुर्ततेसाठी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो औषध विक्रेते सहभागी झाले. हा मोर्चा जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुधीर भास्करवार, कोषाध्यक्ष बंटी घाटे, सचिव रणजीत दांडेकर, सहसचिव अनुप वेगिनवार, आशिष गौरकार, सचिन जोगी, मंगेश गोरंटीवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळल्याने औषध मिळविण्यासाठी रुग्णांची चांगलीच दमछाक झाली. मात्र औषध विक्रेता संघटनेच्यावतीने आणीबाणीच्या प्रसंगी औषध उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती. (प्रतिनिधी)
औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
By admin | Updated: October 15, 2015 01:03 IST