साजरी झाली पुन्हा दिवाळी : हंसराज अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशचंद्रपूर : खासदार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तब्बल २४ वर्षानंतर जिल्ह्याला केंद्रात स्थान मिळाल्याचा आनंद कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही झाला. विशेष म्हणजे, एकाच वॉर्डात केंद्रीय राज्यमंत्री हंजराज अहीर आणि राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असल्याने जिल्ह्याचाच नाही तर विदर्भाचा विकास आता सहज शक्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. रविवारी खासदार हंसराज अहीर यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. फटाक्याच्या आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातही हा आनंदोत्सव साजरा झाला. त्यामुळे पुन्हा एकदा दिवाळी आली की काय, असा भास होत होता.तब्बल चारवेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हंसराज अहीर यांना केंद्रात स्थान मिळाले आहे. यापूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी कोळसा घोटाळा, कोलगेट घोटाळा उघडकीस आणून सरकारला चौकशी समिती नेमण्यास भाग पाडले होते. त्यांच्या कामाची दखल मोदी सरकारने घेत कामाची पावती म्हणून त्यांना केंद्रातील मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. तगडा जनसंपर्क आणि सामान्यांचा नेता अशी ओळख असलेल्या अहीर यांना केंद्रातील मंत्रीपद मिळाल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.मंत्रीमंडळातील त्यांचे स्थान दोन दिवसापूर्वीच निश्चित झाले होते. तत्पूर्वी त्यांना पंतप्रधानांच्या कार्यालयातून दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे निमंत्रण आले होते. तेव्हापासूनच चंद्रपूर जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात होता. दरम्यान रविवारी शपथविधी सोहळ्यानंतर गावागावांत फटाके तथा मिठाई वाटून भाजपा पदाधिकारी तसेच नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.चंद्रपुरातील गोल बाजार परिसरात असलेल्या हंसराज अहीर यांच्या घरी रविवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली. शपथविधी आटोपल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढली. कस्तुरबा चौकामध्ये प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर गांधी चौक, जेटपुरा गेट मार्गे शहरात मिरवणूक काढण्यात आली. बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती, कोरपनासह गावागावांत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. अनेकांनी पेढे वाटले. कस्तुरबा चौकामध्ये कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना थांबवून पेढे वाटले. (नगर प्रतिनिधी)
चंद्रपुरात जल्लोष
By admin | Updated: November 9, 2014 22:29 IST