सांडपाणी रस्त्यावर : साफसफाईकडेही नगरपालिकेचे दुर्लक्षवरोरा : शहराची लोकसंख्या लक्षात घेता येथील नागरिकांना मुुलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. सांडपाण्याच्या समस्येसह सध्या अनेक समस्यांनी शहराला ग्रासले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करण्यास टाळाटाळ होत आहे. काही भागात नियमित घंटागाडी येत नसल्याने ओला व सुखा कचरा पसरून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीही नागरिकातून व्यक्त होत आहे.शहरातील राममंदिर वॉर्डातील जमीन लेवलला असणाऱ्या नालीचे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने ऐन उन्हाळ्यातही दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा होत आहे. याची माहिती मागील काही वर्षांपासून वारंवार लोकप्रतिनिधीसह नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. तरीही याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येते. सफाई कामगारांना नाली साफ करण्याबाबत सांगितले असता त्यांच्याकडून चालढकल केली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. परिणामी नाली भरुन पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. याच रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये- जा करावी लागत आहे. घरासमोरच सांडपाणी वाहत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा याची माहिती न.प. कर्मचाऱ्यांना, नगरसेवकांना देऊनही जाणूनबुजून ही कामे टाळली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शहरातील मुख्य मार्गावर डोंगरवार चौक ते बँक आॅफ इंडियासमोरील नाली ही ठिकठिकाणावरुन बंद असून कचऱ्याचा ढिग साचलेला दिसतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळते. शहरात शहीद शेडमाके चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ड्रेनेजचे बांधकाम करण्यात आले. त्या बांधकामाला अंदाजे दोन वर्षांचा कालावधी होत असताना अजूनपर्यंत साफसफाई न केल्यामुळे त्यातून निघणाऱ्या उग्र वासामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात अद्यापही नाल्या न बांधल्यामुळे कच्चा नाल्यांच्या कडेला मुंगूस, घुस यांनी बिळे केली आहेत. परिणामी नाल्या तुंबून किटकांची उत्पत्ती होत आहे. शिवाय इतर नाल्यांमध्ये काळेकुट पाणी, प्लॉस्टिक आणि अन्य टाकावू वस्तु तुंबून गेल्या आहेत. लोकप्रतिनिधीकडून आश्वासनाशिवाय कामाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण ज्या मुलभूत सुविधांसाठी आदी खर्च करायला पाहिजे, ते न करता एकाच कामावर अनेकदा लोकांच्या पैशाची उधळण करणारे लोकप्रतिनिधी नगर परिषदेमध्ये असल्याने शहराचे वाटोळे होत आहे. असे काही नागरिकांनी बोलून दाखविले. पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराईला आमंत्रण देण्यापेक्षा शहरातील नाल्यांची सफाई केल्यास नागरिकांच्या हिताचे ठरेल.गेल्या तीन महिन्यांपासून औषध फवारणीही करण्यात आलेली नाही आणि केल्यास ती इतकी थातूरमातूर असते की सकाळी औषध फवारल्यानंतर दुपारपर्यंत माश्या, डास यांचे आमगन होते. औषध फवारणीचा केवळ देखावा नगरपरिषदेकडून केला जातो. पावसाळ्यापूर्वीच साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून ताप, अशक्तपणा, उलट्या, हगवण व डेंग्युचे लक्षणे असणारे आजार उद्भवत आहेत. पावसापूर्वीच नगरपालिकेकडून त्वरित या समस्येचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
वरोऱ्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा
By admin | Updated: June 20, 2016 00:40 IST