कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहे. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाची फलश्रुती बाहेर रस्त्यावर दिसत नसली तरी शुक्रवारी येथील शासकीय कार्यालयांमध्ये दिसून आली.
नागभीड नगर परिषद विविध खेड्यांची मिळून बनली आहे. विविध कामांसाठी येणाऱ्या लोकांची या नगर परिषदेत यापूर्वी नेहमीच रेलचेल दिसायची. मात्र शुक्रवारी अशी रेलचेल दिसून आली नाही. अशीच अवस्था पंचायत समितीमध्ये दिसून आली. काही सरपंच, ग्रामसेवक, रोजगारसेवक, शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांचा अपवाद वगळता नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. तहसील कार्यालयाचा फेरफटका मारला असता याहून वेगळी स्थिती नव्हती.