आरोग्य धोक्यात येणार : उपसरपंचाने दिले नाहरकत प्रमाणपत्रमूल: सरपंचासह ग्रामपंचायत कमिटीची दिशाभूल करुन उपसरपंचांनी बोरचांदली आणि लगतच्या गावातील शेती तसेच गावकऱ्यांसाठी भविष्यात धोकादायक ठरणारा डांबर प्लाँट उभारण्यासाठी ना- हरकत दाखला दिल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाने वातावरण निर्माण झाले आहे. डांबर प्लाँट उभारण्यात येऊ नये, अशी मागणी गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.आर्थिक प्रलोभनाला बळी पडून उपसरपंचानी सदर डांबर प्लाँटला ना- हरकत दाखला दिले. परंतु याबाबत सरपंचाला तसेच ग्रामपंचायत कमिटीला कोणतीही माहिती दिली नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य महेश कटकमवार, लोकनाथ मेश्राम, वासुदेव येनुगवार, सुनील यनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बोरचांदलीचे सरपंच उषा दुर्गे ही अनुसूचित जमातीची महिला असून अल्पशिक्षित असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच गौरव पुपरेट्टीवार हेच चालवितात. आपला आर्थिक लाभ करुन घेण्यासाठी उपसरपंचांनी डांबर प्लाँटमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या शेती आणि गावकऱ्यांचा आरोग्यावर भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांच्या विचार केला नाही. पुपरेड्डीवार यांनी अल्प शिक्षित सरपंचांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ना हरकत दाखल्यावर त्यांची सही घेऊन डांबर प्लाँट मालकाकडून आर्थिक सौदेबाजी केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित गावकऱ्यांनी केला.बोरचांदली गावाशेजारुन वाहणाऱ्या उमा नदीच्या तिरावर होत असलेला हा डांबर प्लाँट अत्यंत धोकादायक असून यामुळे हवेचे तसेच पाण्याचे प्रदूषण होऊन ते शेती आणि गावकऱ्यांच्या आरोग्याला विपरित परिणाम करणारे आहे. सदर डांबर प्लँॅटमुळे भयंकर प्रदूषण होणार असून दहा किलोमीटरचा परिघ क्षेत्रात त्याच्या परिणाम जाणवेल, अशी भीती येनुगवार यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केली. डांबर प्लाँट उभारण्यात येत असलेली जागा नदी किनाऱ्याला लागून असून पूर प्रवर्ग क्षेत्रात येते. डांबर प्लँॅट मालक नदीतील पाण्याचा बेसुमार वापर करुन दूषित पाणी नदीमध्ये सोडण्याची शक्यता असल्याने नदीचे पाणीही दूषित होऊन त्यातील जीवजंतूंना धोका निर्माण होईल. सदर डांबर प्लाँटला उपसरपंचानी ना हरकत दाखला दिला असला तरी संपूर्ण गावकऱ्यांच्या विरोध आहे. डांबर प्लाँट होऊ नये, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. डांबर प्लँट उभारणीचे काम ताबडतोब बंद करण्यात न आल्यास गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला दिनकर येनूगवार, अमित येनगंटीवार, मयूर कावळे, दिनेश येनूगवार, सचिन येलट्टीवार, नीलेश कटकमवार, अभिषेक पोरेड्डीवार, शैलेष कटकमवार, राजीव येनूगवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
डांबर प्लाँटला नागरिकांचा विरोध
By admin | Updated: February 10, 2016 01:12 IST