लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. बुधवारी पहिल्या दिवशी त्याला जिल्हाभरातील नागरिक व व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. २१ ते २५ एप्रिल २०२१ आणि २८ एप्रिल ते १ मे २०२१ अशा दोन टप्प्यांत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. झपाट्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा उच्चांक व मृत्यूचे तांडव सुरूच असल्याने चंद्रपूर शहरासह व ग्रामीण भागातील नागरिकांनीही कडकडीत बंद पाळला. रस्त्यांवरील वाहनांची तुरळक गर्दी, रुग्णालये व मेडिकल स्टोअर्सचा अपवाद वगळल्यास बुधवारी सर्व व्यवहार बंद असल्याचे दिसून आले.
हातगाडीवरील विक्रेत्यांचे हाल चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सुमारे हातगाडीवर विविध वस्तू विकणारे सुमारे ३५ हजार विक्रेते आहेत. ब्रेक द चेन मोहिमेपासून त्यांच्या व्यवसायाला फटका बसला. तेव्हापासून त्यांच्या जगण्याचे वांद्ये झाले. जनता कर्फ्यू लागू झाल्याने त्यांचे हाल सुरू आहेत.
चंद्रपुरातील बाजारात शुकशुकाट जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा रविवारी केली होती. त्यामुळे नागरिकांना आवश्यकतेनुसार किराणा सामान विकत घेऊन साठविण्याची मुभा मिळाली. मंगळवारी चंद्रपुरातील गोलबाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. आज किराणा, धान्य व अन्य जीवनाश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकाने कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यू प्रतिसाद दिला. सराफा, कापड व्यापाऱ्यांचाही प्रतिसादसराफा कापड बाजार व अन्य व्यापारी आस्थापनांनी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीत व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. काही मागण्याही मांडल्या. मात्र, शहरातील कोरोना उद्रेक लक्षात घेऊन प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू केल्याने व्यापाऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याचे आज दिसून आले. भाजीपाला, फळ मार्केट बंददाताळा मार्गावरील महात्मा जोतिबा फुले भाजीपाला बाजार बुधवारी बंद होता. या बाजारातून चंद्रपूर शहर व काही तालुक्यात भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. याच परिसरातील फळ बाजाराचे व्यवहारही बंद ठेवण्यात आले.
विनाकारण फिरणाऱ्यांना चाप जनता कर्फ्यू दरम्यान जटपुरा गेट, गांधी चौक, पोलीस वाहतूक शाखा तुकूम मार्ग व बंगाली कॅम्प चौक परिसरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे. विनाकारण शहरात फिरणाऱ्यांची पोलीस चौकाचौकांत नाकाबंदी करून तपासणी करीत होते.
पेट्रोल पंपावर गर्दीकडक लॉकडाऊन लागू होण्याच्या धास्तीमुळे चंद्रपुरातील वाहनधारकांनी आज पेट्रोलपंपावर मोठी गर्दी केली. सकाळी १० वाजता दुचाकीचालक व ऑटोची रांग लागली होती. पेट्रोल पंप सुरूच राहणार असे पेट्रोल पंपचालकांनी सांगितल्यानंतरही उद्या काय होणार, याची खात्री नसल्याने भीतीमुळे वाहनात पेट्रोल भरून घेताना दिसले.
अत्यावश्यक सेवा सुरूच सर्व रुग्णालये, औषधी दुकाने, घरपोच सेवासह दूध वितरण, वर्तमानपत्र, सिलिंडर वितरण व हॉटेलमधून डिलिव्हरी बायद्वारे घरपोच पार्सल पोहोचविण्याची सेवा आज सुरू होती. कृषी केंद्र व पशुखाद्य दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवागनी दिली. मात्र, चंद्रपुरातील दुकाने बंद दिसून आली.