चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चोरा ग्रामसभेला वनहक्क कायद्यांतर्गत १ हजार ९५९ हेक्टरचा सामूहिक वनहक्काचा दावा मिळाला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थ या वनावर आपले हक्क प्रस्थापित करणार असून, देखरेख, नियोजन, संरक्षण करणार आहे. या वनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरही ग्रामस्थांचा हक्क राहणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव येथील ग्रामस्थांनी शासनासोबत मोठा संघर्ष करीत जिल्ह्यात पहिल्यांदाच वनहक्काचा दावा मिळविला. त्यानंतर, भद्रावती तालुक्यातील सीताराम पेठ, कोंढेगाव, पिरली, मासळ, धानोली आदी गावांनाही वनहक्काचा दावा मिळाला आहे. यामुळे तेथील ग्रामस्थ आपली उपजीविका या वनावर करीत शाश्वत विकास साधत आहे. दरम्यान, भद्रावती तालुक्यातील चोरा ग्रामसभेने १ हजार ९५९ एकर (७९२,९२ हेक्टर) जागेवर वनहक्क समितीकडे दावा सादर केला. यावर वनहक्क समितीने पडताळणी करीत निष्कर्ष नोंदवून हा दावा ग्रामसेवक उमेश विंचोलकर यांच्याकडे सुपुर्द केला. त्यानंतर सचिवांनी ग्रामसभा बोलावली आणि यावर चर्चा घडवून आणली. ग्रामसभेमध्ये दावा पात्र केल्यानंतर पुढील कारवाईसाठी उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा यांच्याकडे पाठविला. या समितीने वनहक्क दाव्यावर चौकशी करून, हा दावा पात्र ठरवून जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे सामूहिक वनहक्काचे पत्र देण्यासाठी सादर केला. जिल्हा वनहक्क समितीने या दाव्यावर चर्चा करून तो दावा पात्र ठरविला. दरम्यान, २० जुलै रोजी भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोडे यांच्यामार्फतीने या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते चोरा गावामध्ये ग्रामसभेला पत्र सुपुर्द केले. तालुक्यात हा सर्वात मोठा वनहक्काचा दावा आहे, हे विशेष.
कोट
मागील काही वर्षांपासून चोरा गावातील वनहक्काबाबत प्रशासनाकडे पाठपुरवा सुरू केला. यासाठी ग्रामस्थांनी मोलाची मदत केली. यामुळेच आज चोरा गावाला वनहक्काचा दावा मंजूर झाला असून, ग्रामस्थांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे.
- माधव जीवतो़डे, कार्यकर्ते, पर्यावरण मित्र संस्था
बाॅक्स
वायगाव रय्यतवारी रिठलाही मिळाला दावा
तालुक्यातील वायगाव रय्यतवारी रिठ या गावाला १४८ हेक्टरवर वनहक्काचा दावा मिळाला असून, या संदर्भातील पत्र ग्रामस्थांकडे सुपुर्द करण्यात आले.