कुषोषण वाढले : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षपिंपळगाव (भो) : चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांना शिक्षणाची ओढ लागावी, त्याच्यांतील कुपोषण दूर होऊन ते सुदृढ व्हावेत, या हेतुने ग्रामीण व शहरी भागात अंगणवाडीची निर्मीती करण्यात आली. त्याद्वारे बालकांना विविध प्रकारचा आहार दिला जातो. मात्र तालुक्यातील बहुतांश अंगणवाडीत शिरा, उपमा, सातूचे पीठ लहान चिमुकल्यांना मिळत नसुन हा खाऊ जनावरांना दिल्या जात असल्याचा चर्चा आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ब्रह्मपुरी तालुक्याल अनेक अंगणवाड्यांमध्ये बालकांना हा सकस आहार दिलाच जात नाही. केवळ चव नसलेला पिवळा भात दिल्या जात असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहे. अनेक अंगणवाडीत चिमुकल्यांना खेळण्यासाठी असलेले साहित्य बेपत्ता असुन ते गेले कुठे, हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. तालुक्यातील कित्येक अंगणवाड्यांत अंगणवाडीसेविका व मदतनिसांना ेअंगणवाडी उघडण्याचा विसर पडतो. त्यामुळे अनेकदा सकाळी ११ वाजतानंतर अंगणवाड्या उघडल्या जातात. परिणामी चिमुकली मुले रस्त्यावर खेळताना दिसतात. अनेक अंगणवाड्यांच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आहार बेपत्ता केल्या जात असल्याने मुलांचे कुपोषण कमी होण्याऐवजी ते वाढत असल्याची ओरड पालकांकडून होत आहे. या सर्व बाबीकडे वरिष्ठांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या सकस आहाराची चौकशी करून अंगणवाड्यांच्या सर्वांगिन विकासासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांकडून अनेकदा करण्यात आली. मात्र संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरपणे लक्ष देऊन ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्राच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
चिमुकल्यांचा खाऊ जनावरांच्या घशात
By admin | Updated: October 9, 2014 22:59 IST