घुग्घुस : येथील वेकोलिच्या घुग्घुस खुल्या कोळसा खाणीतील प्रदूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता वर्धा नदीत सोडले जात आहे. याशिवाय वणी - घुग्घुस मार्गावरून दिवसरात्र होणाऱ्या वाहतुकीतून उडणारी धूळ पाण्यावर साचत असल्याने पाण्यावर दूषित लेअर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत हे वास्तव आढळून आले आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करावी, असे पत्र वेकोलि व्यवस्थापनाला देण्यात आले. मात्र या पत्राकडे वेकोलि सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. ही गंभीर बाब माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे.घुग्घुस खुल्या कोळसा खाणीतून आॅईल मिश्रीत पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता नाल्याद्वारे सरळ वर्धा नदीत सोडले जात आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. खाणीतील दूषित पाणी बाहेर सोडण्यापूर्वी विशिष्ठ संयंत्राद्वारे या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध करणे बंधनकारक आहे. तसे संयंत्रही वेकोलिकडे आहे. पण हे संयंत्र अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. ही बाब काही महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीतही आढळून आली होती. नदीचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेकोलिच्या अधिकाऱ्यांना प्रदूषण थांबविण्याकरिता उपाययोजना का करण्यात येत नाही, या आशयाची शोकाज नोटीसही बजावली. मात्र वकोलिने कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. नायगाव कोळसा खाणीचे दूषित पाणीही वर्धा नदीत सोडणे सुरू आहे. (वार्ताहर)
रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत
By admin | Updated: March 22, 2015 00:04 IST