अन्न सुरक्षा योजना : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यशलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर व नांदगाव (पोडे) गावाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ शहराच्या धर्तीवर दिला जात आहे. त्यामुळे दोन्ही गावातील ५० टक्क्यांवर शिधापत्रिकाधारकांवर अन्याय झाला होता. सार्वजनिक वितरण व्यवस्थेने दोन्ही गावांचा समावेश ग्रामीण भागाऐवजी शहरी भागात केल्याने शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत होते. या संदर्भात राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री यांनी पाठपुरावा केल्याने दोन्ही गावातील शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत बीपीएल, अंत्योदय व एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य कुटुंब म्हणून समावेश केला आहे. याच प्रवर्गातील कार्डधारकांना धान्याचा पुरवठा केला जातो. याचे प्रमाण एकूण कार्डधारकांच्या तुलनेत शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांना ४५.३४ टक्के करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांसाठी एकूण रेशन कार्डपैकी ७६.३२ टक्के रेशन कार्डचा समावेश करून धान्य वितरण करण्याचा कायदा करण्यात आला. त्यात अन्न पुरवठा विभागाने अन्न सुरक्षा योजनेच्या कायद्याला बगल देत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर व नांदगाव (पोडे) या गावांचा समावेश शहरात करून शिधापत्रिका धारकांवरच सूड उभारला होता. यामुळे विसापूर व नांदगाव (पोडे) येथील जवळपास दोन हजारांवर शिधापत्रिका धारकांवर अन्याय झाला होता. यासाठी स्थानिक पातळीवरील जनप्रतिनिधींनी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदने सादर करून साकडे घातले. अनेकदा शिधापत्रिका धारकांंनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळावे म्हणून विनंती केली. तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. वेळप्रसंगी प्रशासनाला वेठीस धरले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. शिधापत्रिका धारकांची तळमळ ऐकून ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. त्यामुळे विसापूर व नांदगाव (पोडे) येथील केसरी शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणार आहे, अशी माहिती बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे यांनी दिली आहे.पुरवठा अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बल्लारपूर तहसील प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतल्याची माहिती आहे.शिधापत्रिकाधारकांचे सर्वेक्षण करण्याचा आदेशजिल्हा अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसील प्रशासनाला विसापूर व नांदगाव (पोडे) येथील शिधापत्रिकाधारकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश ३० जूनला निर्गमीत केले आहे. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या निकषानुसार धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे दोन्ही गावातील एपीएलच्या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून कमी दराचे धान्य उपलब्ध होणार असून महागाईच्या काळात गरीबांना दिलासा मिळणार आहे.
विसापूर, नांदगाववासीयांना मिळणार स्वस्त धान्य
By admin | Updated: July 6, 2017 00:44 IST