गोंडपिपरी: शहरातून जाणाऱ्या अहेरी- चंद्रपूर राज्य मार्गावरील एका जमिनी संदर्भात व्यापाऱ्यांच्या दोन गटांत चांगलीच जुंपली आहे. अगोदर हाणामारी व त्यानंतर न्यायालयीन वाद अशा दुहेरी भानगडीनंतरही सदर प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांची कुरघोडी अद्यापही सुरुच आहे.येथील कन्यका सभागृहाकडे जाणाऱ्या मार्गावर अशोक माणिक यांचे निवासस्थान आहे. त्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी घराचे बांधकाम सुरू केले असता, शहरातीलच व्यापारी प्रदीप बोनगिरवार, सुनिल वेगिनवार वेगिनवार, रितेश वेगिनवार, किशोर माडुरवार यांनी आरोप नोंदवून अतिक्रमाणातून बांधकाम करण्यात येत असल्याबाबतची तक्रार नोंदविली. यावेळी पोलीस विभागासह उपविभागीय अधिकारी कार्यालयातून या प्रकरणी जागेची मोजणी केली असता माणिक यांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. मात्र माणिक यांनी न्याय न मिळाल्याच्या कारणाहून गोंडपिपरी प्रथम श्रेणी न्यायालयात दाद मागितली मात्र तेथूनही मोजणीअंती माणिक यांची मागणी फेटाळून लावत अतिक्रमीत जागा वगळता इतर रिकाम्या जागेत बोनगिरवार व इतर सहकाऱ्यांना बांधकाम करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती प्रदीप बोनगीरवार व सहकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तर उर्वरित अतिक्रमण जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याबाबतही त्यांनी सांगितले.एवढे सर्व झाले असतानाही गेल्या काही दिवसांपासून अशोक माणिक यांनी व्यापाऱ्यांविरुद्ध जमीन हडपल्याचे आरोप प्रसिद्ध माध्यमांमार्फत केले. यात त्यांनी पोलीस विभागालाही लक्ष्य केल्याचे सांगितले जाते. अवैध बांधकाम व जमीन हडपविणाऱ्यांविरुद्ध थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने सादर करुन न्याय न मिळाल्यास येत्या २ जूनपासून येथील पोलीस ठाण्यासमोर भर उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.दरम्यान, आपली बाजू खरी करण्याकरिता माणिक हे प्रसिद्धी माध्यमाद्वारे उपोषणाच्या पोकळ धमक्या देवून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असून उपविभागीय कार्यालय तथा न्यायालयीन मोजणीअंती माणिक यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले असतानाही प्रशासनाला धारेवर धरुन इतरांची नाहक बदनामी ते करीत असल्याचा आरोप बोनगिरवार यांनी केला आहे.माणिक यांनी विकत घेतलेली जागा ही तीन भावडांची संपत्ती असताना केवळ दोन भावंडाच्या सहमतीविणा एका भावाच्या स्वाक्षरीने रजिस्ट्री करुन संपूर्ण जागेवर ताबा मिळविण्याचा खोटा दावा करीत असून न्यायालयाच्या आदेशानंतरही कुरघोडी करीत असल्याचा आरोप प्रदीप बोनगीरवार व सहकाऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
न्यायप्रविष्ट प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांची कुरघोडी
By admin | Updated: May 27, 2015 01:17 IST