चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक असे परिवर्तन करणारे प्रत्येक थोर पुरुष पत्रकारच होते. पत्रकाराची शक्ती ही क्रांतीची शक्ती असते. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाताना पत्रकारितेला मिशन समजून कार्यरत पत्रकार बांधवांसाठी नवीन इमारतीच्या बांधकामात मी योगदान देऊ शकलो, याचा मला मनापासून आनंद आहे. हे पत्रकार भवन ज्ञानभवन, संदर्भभवन ठरावे आणि या जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे सर्वात मोठे शक्तिकेंद्र ठरावे, अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात आ.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर महापौर राखी कंचर्लावार, आ. किशोर जोरगेवार, उपमहापौर राहुल पावडे, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी केले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, आ. किशोर जोरगेवार यांचीही भाषणे झालीत. या पत्रकार भवनाच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी महापौर अंजली घोटेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता उदय भोयर, कंत्राटदार सचिन डवले यांच्यासह अनेकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. श्रमिक पत्रकार संघातर्फे लॉकडाऊनदरम्यान ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिेके प्रदान करण्यात आली संचालन आशिष अंबाडे यांनी केले तर आभार सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांनी मानले.