चंद्रपूर : केंद्रात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर ना. हंसराज अहीर यांचे जिल्ह्यातील प्रथम आगमनानिमीत्त दमदार स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘हंसराज भैय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा दिल्या.जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खांबाड्यापासून सुरू झालेली त्यांच्या स्वागताची मालिका थेट त्यांच्या चंद्रपुरातील स्वगृहापर्यंत कायम होती. त्यांच्या स्वागताने चंद्रपुरात सायंकाळी दिवाळी साजरी झाली. चंद्रपुरात बँडच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. जटपुरा गेट परिसरात लाडूतुला करण्यात आला. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जनसागर रस्त्यावर अवतरला होता.चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा गावात ना. हंसराज अहीर यांचे स्वागत भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी अहीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर टेमुर्डा येथीही सत्कार करण्यात आला. वरोरा येथील आनंदवन चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अहीर यांचा लाडुतुला करण्यात आला. याप्रसंगी अहीर म्हणाले, आता जबाबदारी वाढली आहे. शेतकरी, शेतमजुर, बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आपन सतत प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आनंदवनकडे जाताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवनच्या विद्यार्थ्यांनीही अहीर यांचे स्वागत केले. बालकदिनानिमित्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आनंदवनात अहीर यांनी प्रथम कर्मयोगी बाबा आमटे, व साधनाताईंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर डॉ.भारती आमटे, डॉ. शितल आमटे-करजगी, गौतम करजगी, विजय पोळ, नारायण हक्के, सदाशीव ताजने यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी माजी पालकमंत्री संजय देवतळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.भगवान गायकवाड, सुनीता काकडे, ओमप्रकाश मांडवकर, देवीदास ताजने, अली, मोकाशी आदी उपस्थित होते.श्रेय तुमचे, मी फक्त निमित्त-अहीरभद्रावती येथे अहीर यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोर भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान मिळाले. याचा आनंद आहे. परंतु यामध्ये श्रेय मात्र तुमचेच आहे. मी फक्त निमित्त आहे. तुमच्या प्रेमामुळे माझी शक्ती वाढली असून बेरोजगार, शेतकऱ्यांचे तसेच पाणी व वीज समस्या केंद्र तथा राज्याच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी भाजपाचे चंद्रकांत गुंडावार, अशोक हजारे, श्रीधर बागडे, विजय वानखेडे, तुळशीराम श्रीरामे, प्रविण सातपुते, राजेश भलने, प्रशांत डाखरे, रवी नागापूरे, सुजीत चंदनखेडे, चंद्रकांत खारकर, अफझल भाई, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होेते. संचालन प्रविण आडेकर यांनी केले.दरम्यान घोडपेठ, ताडाळी, पडोली, घुग्घुस फाटा, उर्जानगर चौक, गजानन महाराज मंदीर चौक, जनता कॉलेज चौक, वरोरा नाका, विश्रामगृह, प्रियदर्शिनी चौक, जटपुरा गेट, या ठिकाणीही त्यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतीशबाजीने शहर उजळून निघाले. युवावर्गही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. ठिकठिकाणी फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. जटपुरा गेटमधून महात्मा गांधी मार्गावरून खुल्या वाहनातून त्यांची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. गांधी चौकात आगमन होणार होते. त्यामुळे सायंकाळपासूनच कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर जमले होते. मात्र ठिकठिकाणचे स्वागत स्वीकारत ते गांधी चौकात रात्री उशिरा पोहचले. गांधी चौकात ही रॅली पोहचल्यावर तिथे त्यांचा भव्य पुष्पहाराने जाहीर सत्कार करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)
अहीर यांच्या स्वागताला चंद्रपूर लोटले
By admin | Updated: November 15, 2014 01:29 IST