लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी (दि. २५) विधानसभेत दिली. राज्याचे माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती. यापूर्वी त्यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होतात. नोकरभरतीत पैसे खाल्ले जातात. आरक्षण हद्दपार केले जाते. तरीही कारवाई होत नाही. चंद्रपूर जिल्हा बँकेमध्ये आरक्षण धुडकावून लावण्याचा प्रताप संचालक मंडळाने केला. दिव्यांग, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे आरक्षण असले पाहिजे. पण, यापैकी कुणालाही आरक्षण दिले गेले नाही. जी नोकरभरती झाली, त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा मुद्दा आमदार मुनगंटीवार यांनी विधिमंडळ सभागृहात उपस्थित केला.
लक्षवेधी उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते हॅक केले. ३३ ग्राहकांचे ३ कोटी ७० लाख ६४ हजार रुपये एका अज्ञात व्यक्तीने हरयाणाच्या खात्यात वळते केले. या दोनही प्रकरणात सूचनेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने एसआयटी लावण्यात येईल, असे ते म्हणाले.
'दूध का दूध, पानी का पानी'एसआयटी लावताना त्याची कार्यकक्षा ठरवावी. यामध्ये सर्व सदस्यांसोबत चर्चा व्हावी, तेव्हा कुठे 'दूध का दूध, पानी का पानी' होईल. ही चौकशी लावताना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने लावा, अशी सूचनाही मुनगंटीवार यांनी सभागृहात केली.