चांदा नझुल, मोहल्ला-बाबूपेठ येथील शीट नं २ ब्लॉक नंबर १०४ न. भू. क्र. १४७५० ही शासकीय नझुल सरकारी जमीन एका कंपनीला काच फॅक्टरीसाठी लीजवर देण्यात आली होती. मात्र, ही कंपनी बंद पडली. मागील ६० वर्षांपासून शासकीय नझुल सरकारी जमिनीवर अनेक दारिद्र्य रेषेखालील कुटुंब वास्तव्याला आहेत. मात्र या परिसरात मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्यात, शासकीय नझुल सरकारी जमिनीची लीज तात्काळ रद्द करून सरकारजमा करण्यात यावी, मानवी हक्कानुसार या परिसरातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, घरकुल मंजूर करण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.
अशा आहेत समस्या
चांदा नझुल, मोहल्ला-बाबूपेठ परिसरात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांकडे स्थायी घरपट्टे नाही. गृहकर पावती व एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या व आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही सुविधा नाही. रस्ते व नाली बांधकाम झाले नाही, त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.