पतीला अटक : चारित्र्याचा संशयगोंडपिपरी : येथील इंदिरानगर वॉर्डात राहणाऱ्या विठ्ठल घोसे यांची विवाहित मुलगी माहेरी आली असता तिला भेटण्याच्या बहाण्याने येऊन तिच्या चारित्र्याबाबत संशय ठेवणाऱ्या पतीने आज गुरुवारी सकाळच्या सुमारास पत्नीवर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले. सदर घटना आज गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमी पत्नीला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तर घटनास्थळावरुन पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.स्थानिक इंदिरा नगर वॉर्ड रहिवासी विठ्ठल घोसे यांची मुलगी गायत्री हिचा दोन वर्षापूर्वी नागपूर येथील हरीश भास्कर डाहे (२५) याच्याशी विवाह झाला. आठवडी बाजार फिरुन मसाले विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हरीश व गायत्री नागपूर येथे राहून संसार चालवित होते. अशातच गायत्रीला दिवस गेले. प्रसुतीसाठी आठ महिन्याची गर्भवती असताना ती गोंडपिपरी येथे माहेरी आली. तिला भेटासाठी काल रात्री हरीशही सासरी पोहोचला. सकाळी गायत्री लगतच्या शेतात गेली असता परतताना हरीशने तिच्या पोटावर व पाठीवर तसेच हातावर धारदार चाकूने हल्ला केला. गायीत्रीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे हरीशने तेथून पळ काढला. गायत्रीला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. काही तरुणांनी हरीश पाठलाग केला व सोबतच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी हरीशला गोंडपिपरी- अहेरी मार्गावरील सुरगाव येथून चाकूसह ताब्यात घेतले. गर्भात आठ महिन्याचे बाळ असल्याने जखमी गायत्रीला गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रथमोपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. यानंतर गायत्रीची आई शकुंतला विठ्ठल घोसे हिने गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून आरोपी हरीशविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी अप क्र. ४७/२०१४ भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार श्याम गव्हाणे करीत असून आरोपीला पोलीस रशीद पठाण, प्रभाकर उमरे, राहुल सहारे यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी)
पतीचा गर्भवती पत्नीवर चाकूहल्ला
By admin | Updated: November 6, 2014 22:52 IST