लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूच्या दोन लाटेमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस निघाल्यानंतर मृत्यूची संख्या कमी झाली. आता ओमायक्राॅनचे देशात रुग्ण आढळून महिना लोटला. यावर लस द्यायची कोणती हे अद्याप ठरले नाही. देशातील ३६ प्रयोगशाळेत संशोधन सुरू असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मालवीय यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिले.कोरोना विषाणूनंतर आता पुन्हा जगात भीतीचे वातावरण आहे. आता तिसरी लाट ओमायक्राॅन विषाणूने येत आहे. याचा पहिला रुग्ण आफ्रिकेत मिळाला. आता जगभरात ५९ देशात या विषाणूचा प्रसार झाला आहे.खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस प्रभावशाली आहे का, हे आरोग्यमंत्र्यांना विचारले. यावर देशातील ३६ प्रयोगशाळेत संशोधन सुरु असून अद्याप या दोन लसी या विषाणूवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत की नाही यावर निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर काय प्रभाव पडेल, तसेच पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोना संक्रमितांमध्ये (पोस्ट कोविड ) उद्भवलेल्या विविध आजारावर उपचारासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना आखल्या हे प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केले. यावर कोरोना विषाणू हा वेळोवेळी आपली कृती बदलत आहे. देशातील ३६ प्रयोगशाळेत संशोधन झाल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उत्तर आरोग्यमंत्री मनसुख मालवीय यांनी दिले. यावेळी खा. बाळू धानोरकर यांनी आरोग्यासंदर्भात अन्य विषयावरही प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.