नागाभीड : गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडवसाठी मृत्यूचा घाटच ठरला होता. मात्र आता पुलासह कालव्याचेही काम करण्यात आले आहे. परिणामी या कालव्याबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती दूर झाली आहे.
गोसेखुर्द धरणाचा मुख्य उजवा कालवा ब्रम्हपुरी तालुक्यातून आसोला मेंढा तलावाकडे गेला आहे. या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून मौशीमार्गे नवेगाव पांडव येथून गोंडपिपरीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून नागभीड तालुक्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार, असे अगोदर सांगण्यात येत होते. मात्र ही केवळ भूल होती. नागभीड तालुका तांत्रिक कारणांमुळे या कालव्याच्या सिंचनापासून वंचितच राहणार आहे.
या उपकालव्याचे काम सलगपणे पूर्ण झाले नाही. खंड खंड स्वरूपात कालव्याचे काम झाले असल्याने या कालव्याला अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. जवळपास १२ वर्षांपूर्वी या उपकालव्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात शासनाने या कालव्याबाबत हात आखडते घेतल्याने कालव्याचे काम बंद पडले होते. त्यामुळे हा कालवा जिवावर उठला होता.
बॉक्स
पाच जणांचे गेले बळी
नवेगाव पांडवकडून बाळापूरकडे एक रस्ता जातो. या रस्त्याने परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिक प्रवास करीत असल्याने अतिशय वर्दळ या रस्त्याने असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कालव्याचे काम करण्यात आल्याने दोन्ही बाजूला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. कालवा गावाला लागूनच असल्याने कधी शौचास गेलेल्या, तर कधी अनवधानाने या कालव्याने नवेगाव पांडव येथीलच ५ व्यक्तींचा बळी घेतला होता. कमलेश राहाटे, कुमार पांडव, मोरेश्वर विठोबा तिजारे, लक्ष्मण मारोती सालोरकर व एक अन्य असे पाचजण नहराचे बळी ठरले होते. आता कालव्यासह पुलाचेही काम करण्यात आले आहे.
120821\img-20210812-wa0031.jpg
तयार करण्यात येत असलेल्या कालव्यावरील पूल