चंद्रपूर : भर दिवसा घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लांबविणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी दागिने, रोकड असा एकूण दोन लाख ८० हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विजय बंडू चटकी (२४) रा.अमराई वॉर्ड घुग्घुस असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
घुग्घुस येथील एका घरातून सोन्या-चांदीच्या दागिने पळविल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा छळा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. यावेळी विजय चटकी याच्या दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी त्याने साईनगर वॉर्ड क्रमांक ६ येथील एका घरातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विजयकडून ५९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३४ ग्रॅम चांदीचे दागिने, मोबाइल असा एकूण दोन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, संजय आतकुलवार, चंदू नागरे, अमजद खान, कुंदनिसंग बाबरी, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, रवींद्र पंधरे, नरेश डाहुले आदींनी केली.