वेकोलिचा प्रताप : अधिग्रहित जमिनीचा मोबदला मिळण्याआधीच खाणीचे काम सुरूनितीन मुसळेसास्ती वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत पोवनी २ व ३ या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी व वरोडा शेतशिवारातील शेतजमिनीचे अधिग्रहण करून शेतकऱ्यांना मोबदला व नोकरी देण्याचे मान्य केले. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला व नोकऱ्या मिळाल्या नाहीत. असे असताना वेकोलिने संबंधित शेतजमिनीवर कोळसा खाणीचे काम सुरू केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून त्वरीत मोबदला व नोकरी द्या अन्यथा काम बंद करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास वेकोलिच्या विरोधात जनआंदोलन पुकारण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत विविध कोळसा खाणी असून वेकोलिचा विस्तार करणे सुरू आहे. वेकोलिने नव्यानेच पोवनी २ व ३ या कोळसा खाणीसाठी साखरी-पोवनी शेतशिवारातील जवळपास २३६ शेतकऱ्यांच्या ३०५ हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण केले, तर साखरी-वरोडा परिसरातील १८५ शेतकऱ्यांच्या ७७८ हेक्टर शेतजमीन अधिग्रजहत केली आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला व नोकरी देण्याचे कबूल करून २० आॅक्टोबर २०१५ रोजी मोठा वाजागाजा करून धनादेश वाटपाचा मोठा कार्यक्रमही घेण्यात आला. त्यात ४० कोटींच्या धनादेशाचे वाटपही केले. परंतु अनेक शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही तर प्रकल्पबाधित २३६ शेतकऱ्यांपैकी केवळ १३० प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीचे आदेश देण्यात आले. उर्वरित शेतकरी अजूनही नोकरीच्या व मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. या अधिग्रहीत जमिनीवर सेक्शन ९ लागले असून सेक्शन ११ करिता कार्यालयीन कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येते. परंतु वेकोलिने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला व नोकऱ्या देण्यापूर्वीच कोळसा खाणीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले असून वेकोलिविरोधात रोष व्यक्त करीत असून शेतकऱ्यांनी त्वरीत मोबदला देण्याची व नोकऱ्या देण्याची मागणी केली असून तसे निवेदन वेकोलि प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दिली आहे.वेकोलिने या अधिग्रहित जमिनीवर असलेल्या पिकांवर ट्रॅक्टर, बुलडोजर चालवून जमीन साफ करणे व इतर कामे सुरू केली आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे काम थांबविण्याची मागणी केली आहे. सोबतच ज्यांच्या शेतात सिंचनाची सोय आहे, त्यांना एकरी १० लाख रुपये दराने मोबदला देण्यात यावा. सेक्शन ९ नंतर रजिस्ट्री झालेल्यांना चालू सातबाऱ्याप्रमाणे नोकरी देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांना त्वरीत मोबदला व नोकरी दिल्यानंतरच काम सुरू करावे अन्यथा मोठा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देणारे निवेदन राजुरा तहसीलदारांना प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. याप्रसंगी विठ्ठल कावळे, तुळशिराम काटवले, बाबुराव आस्वले, पंढरी काटवले, अनिल पोटे, अमोल काटवले, नथ्थू काटवले, ज्ञानेश्वर काटवले, मधुकर काटवले, आनंदराव चिकनकर, संतोष चौधरी, शेषराव बोंडे, अरुण काटवलेसह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.वेकोलिने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती बदल्यात आर्थिक मोबदला व नोकरी देण्याचे मान्य केले. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांचा मोबदला मिळालेला नाही व नोकऱ्याही मिळालेल्या नाहीत. तरीही वेकोलिने कोळसा खाणीचे काम सुरू केले आहे. वेकोलि आपल्या सोईनुसार शेतकऱ्यांचा मोबदला व नोकरी देत असून ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे. आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास वेकोलि विरोधात जनआंदोलन छेडून सुरू झालेले काम बंद पाडू.- शेषराव बोंडे, प्रकल्पग्रस्त शेतकरी, साखरी
शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोजर
By admin | Updated: March 19, 2016 00:39 IST