वरोऱ्यात आयोजन : शिक्षण प्रसारक मंडळाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमवरोरा : सेवाग्राम व आनंदवनात समाजापासून वंचीत झालेले घटक राहतात. आज वंचितांना या संस्थांनी समाजात ताठ मानेने जगण्याचे शिकविले. त्यांच्या जीवनात प्रकाश टाकणाऱ्या घटकांचा अर्थसंकल्पात समावेश असणार असल्याची ग्वाही शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ व कर्मविर विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदवन येथील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे होते. प्रमुख अतिथी म्हणून हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम व चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. आनंदवन व सेवाग्राम आश्रमाने वंचितांना सामावून घेत त्यांना समाजात सन्मान मिळवून दिला. वंचित याही पेक्षा पुढे गेले पाहीजे. त्यांच्या विकासाचे घटक या येणाऱ्या अर्थसंकल्पात देवून त्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे कार्य केले जाईल. शिक्षणावर लाखो रुपयांचा खर्च होवून शिक्षणात प्रगती होत नाही. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. जग बदलण्याची वाट बघु नका. आपल्यापासूनच त्याची सुरूवात करा, असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांचा तसेच डॉ. विकास आमटे यांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती साकारलेल्या प्रदर्शनाचे ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जि.प. सदस्य विजय वानखेडे यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी तेरवीच्या खर्चाची २० हजार रुपयांची रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुपुर्द केली.कार्यक्रमाला डॉ. भारती आमटे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, पं.स. सभापती सुनंदा जिवतोडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक माजी पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
येता अर्थसंकल्प वंचितांच्या जीवनात प्रकाश टाकणारा असेल - सुधीर मुनगंटीवार
By admin | Updated: January 16, 2016 01:13 IST