विकास खोब्रागडे
पळसगांव (पि.)(चंद्रपूर) : लग्न जुळले. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत असताना अंगाला हळद लागली. नियोजित वरासह मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. लग्नाच्या अगदी १३ व्या दिवशी या नववधूला काळाने हिरावून नेले. ही दुदैवी घटना चिमूर तालुक्यातील पिपर्डा येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सायली प्रकाश सूर्यवशी (विवाहानंतरचे नाव) असे मृत पावलेल्या नववधूचे नाव आहे.
सायलीचा विवाह २० डिसेंबर २०२० रोजी बोडधा येथील प्रकाश सूर्यवंशी या तरुणासोबत झाला. लग्न लागण्यापूर्वीच ती भोवळ येऊन पडली. काही वेळातच ती शुद्धीवर आल्याने विवाहसोहळा पार पडला. नववधू म्हणून सायली सासरी गेली. परंतु रात्रीच तिची प्रकृती पुन्हा खालावली. लगेच चंद्रपूरला एका खासगी रुग्णालयात भरती केले. चार दिवस उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली. तेथून तिला तिच्या आजोबांच्या गावी मोहोडी (नलेश्वर, ता. सिंदेवाही) येथे मुक्कामाला ठेवण्यात आले. २ जानेवारीला पुन्हा प्रकृती बिघडल्याने मध्यरात्री सिंदेवाहीहून तिला चंद्रपूरला खासगी रुग्णालयात हलविले. डाॅक्टरांनी कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. परंतु ३ जानेवारीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यात तिची प्राणज्योत मालवली. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांकडे पोहोचवत असताना वडिलांचा पाय मोडला. तरीही मुलीच्या लग्नापुढे दुःख पचवून विवाह उरकला. मात्र, नियतीला हेही मान्य झाले नाही.